प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये कर्मचारी भरती प्रकरणातील मुख्य आरोपीला धारवाड उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. कॅन्टोन्मेंट सुपरिंटेंडेंट महालिंगेश्वर यल्लाप्पा ताळूकर यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली असता विविध अटींवर त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड कर्मचारी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केली असता 29 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून घेण्यात आली असून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला. त्यानंतर काहीजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेमुळे बेळगाव परिसरात खळबळ उडाली होती. सीबीआयने या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून त्यानंतर सुपरिंटेंडेंट महालिंगेश्वर यांच्यावर कलम 120 बी आयपीसी आणि सेक्शन 7, 8 अन्वये गुन्हा दाखल केला. उच्च न्यायालयात धाव घेतली असता 50 हजार रुपयांचे हमीपत्र व तितक्याच रकमेचा एक जामीनदार, तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करणे, साक्षीदारांना धमकावू नये, न्यायालयाच्या परवानगीशिवाय जिल्हा सोडून इतरत्र कोठेही जाऊ नये, या अटींवर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या संशयिताच्यावतीने अॅड. मुरगेश मरडी यांनी काम पाहिले.









