रोख रक्कमेसह ड्रग्ज जप्त : 30 मतदान केंद्रे संवेदनशील
मतमोजणीच्या तारखेत बदलाची मागणी
7 नोव्हेंबरला राज्यामध्ये 40 मतदारसंघामध्ये एकाच टप्प्यामध्ये निवडणूक होत असून निवडणुकीचा फैसला 3 डिसेंबरला घोषित केला जाणार आहे. याचदरम्यान मत मोजणीची तारीख रविवारी येत असल्याने ती तारीख बदलावी अशा प्रकारची मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आणि संघटनांनी आयोगाकडे केली आहे. कारण 3 डिसेंबर हा रविवारी आला असून ख्रिश्चन धर्मियांचा महत्त्वाचा दिवस असतो. त्या दिवशी ख्रिश्चन समुदाय मोठ्या प्रमाणामध्ये चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी सहभागी होतात. आयोग यासंदर्भात कोणता निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे.
येत्या मंगळवार दि. 7 नोव्हेंबर रोजी मिझोरम राज्याची विधानसभा निवडणूक पार पडत असून सध्याला या ठिकाणी मिझो नॅशनल फ्रंट, काँग्रेस व इतर पक्षांनी प्रचावर जोर दिला आहे. विविध मतदारसंघांना प्रत्यक्ष भेटून मतदारांकडे मत याचना केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक तो पोलिस फौजफाटा सज्ज ठेवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 40 विधानसभा मतदार संघासाठी 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. 450 विभागांमध्ये केंद्रीय पोलिस दलाचे पोलिसही तैनात केले जाणार आहेत. मिझोरमचे मख्य निवडणूक अधिकारी मधूप व्यास यांनी ही माहिती दिली आहे.
निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी अवश्यक त्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सीमा सुरक्षा दल यांच्या दहा तुकड्या, केंद्रीय राखीव पोलिस दलांच्या पाच तुकड्या आणि सशस्त्र सीमा दलाच्या तुकड्याही राज्यामध्ये बंदोबस्तासाठी तैनात केल्या जाणार आहेत. याच दरम्यान विविध ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. यात जवळपास 36 कोटी रुपयांची बेकायदेशीर रोख रक्कम, ड्रग्ज आणि दारु आशा वस्तू निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.
8.57 लाख एकंदर मतदार आपल्या मतदानाचा हक्क 7 नोव्हेंबरला बजावणार आहेत. यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. 1276 निवडणूक मतदान केंद्रांमध्ये 30 मतदान केंद्रे संवेदनशील असल्याची माहिती व्यास यांनी दिली आहे. 174 जण निवडणूक रिंगणात असून यात 18 महिलांनीही उमेदवारी दाखल केली आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट आणि विरोधी पक्ष झोराम पीपल्स मूव्हमेंट पार्टी तसेच काँग्रेस या तीन पक्षांमध्ये ही निवडणूक चुरशीची होणार आहे. भाजप आणि आम आदमी पक्ष यांनी अनुक्रमे 23, 4 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या खेरीज 27 उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
राज्यातील 4 मतदारसंघामध्ये त्रिकोणी स्पर्धा रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऐझवाल उत्तर 3, ऐझवाल दक्षिण 1, सरचिप आणि लुग्लेई पश्चिम या मतदार संघामध्ये सर्वाधिक उमेदवारांनी अर्ज भरले असून या ठिकाणी स्पर्धा अधिक रंगतदार दिसून येणार आहे. तावी, चम्पाई दक्षिण, पूर्व तूलपूल आणि दक्षिण तूलपूल या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार असल्याची शक्यता आहे.









