क्षत्रिय मराठा समाज संघटना निवडणुकीत विजयी झालेल्या परिवर्तन पॅनलच्या सुहास फळदेसाई यांनी दिलेली माहिती
मडगाव : समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांत यश मिळावे यासाठी आवश्यक ती व्यवस्था उभारणे तसेच मराठा संकुलाचे काम पूर्णत्वाकडे नेणे यास आमचे प्राधान्य राहणार असून समाजबांधवांनी नवीन समितीवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू, अशी प्रतिक्रिया क्षत्रिय मराठा समाज संघटनेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या परिवर्तन पॅनलच्या सुहास फळदेसाई यांनी ’तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली. अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज संघटनेच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे 12 ही तालुका प्रतिनिधी विजयी झाले. शिवाय त्यांना एकूण मतदानाच्या तीन चतुर्थांश मते मिळाली. ‘समाज संघटनेच्या नियमानुसार निवडणूक घ्यावी लागली असली, तरी ही निवडणूक द्वेषभावनेने नव्हे, तर खेळीमेळीने पार पडली. आधीच्या केंद्रीय समितीचे काम चांगले वा योग्य नव्हते अशातलाही भाग नाही. बदल हवा म्हणून समाजबांधवांनी नवीन समिती निवडून आणली. समाजबांधवांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवणारी कामगिरी आमच्याकडून घडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे फळदेसाई यांनी सांगितले.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांत यश मिळावे यासाठी आवश्यक ती व्यवस्था उभारण्यात निर्वाचित समिती विशेष लक्ष घालणार आहे. तसेच पडून असलेले मराठा संकुलाचे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी समिती प्राधान्यक्रमाने पावले उचलणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले. याखेरीज समाज सदस्यांची नोंदणी मोहीम हाती घेऊन संघटना समाजबांधवांपर्यंत नेण्याचाही आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. निवडणूक निकालानंतर समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी मराठा संकुलात उपस्थित राहून विजयी पॅनलचे अभिनंदन केले. ही निवडणूक म्हणजे केंद्रीय समिती निवडून आणण्यासाठीची एक लोकशाही प्रक्रिया आहे. निवडणुकीनंतर सर्व मतभेद आणि राजकारण बाजूला सारून सर्वांनी समाजासाठी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. सर्वांना विश्वासात घेऊन आणि सर्वांच्या सहमतीतूनच समाजाचे काम पुढे न्यावे, अशा शुभेच्छा त्यांनी विजयी पॅनलला दिल्या. अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे मावळते अध्यक्ष महेश नाईक गावकर यांनीही निवडून आलेल्या नवीन समितीचे अभिनंदन केले आहे.