पुणे / प्रतिनिधी :
नैसर्गिक संकट लक्षात घेता द्राक्ष पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी प्लास्टिक कव्हरेज अनिवार्य आहे. तसेच बेदाणा साठवणुकीसाठी कांदा चाळीप्रमाणे व्यवस्था व्हावी, अशी अपेक्षा माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे ६३ वे तीन दिवसीय वार्षिक अधिवेशन आजपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी द्राक्षवृत्त स्मरणिका प्रकाशन करण्यात आले.
पवार म्हणाले, अवकाळी पाऊस अथवा हवामानातील बदल यामुळे द्राक्ष पिकाचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच याबाबत धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कर्जात सवलत आणि नवीन कर्ज उपलब्ध व्हावे. ज्याप्रमाणे कांदा चाळी आहेत, त्याप्रमाणे बेदाणा साठवणूकीसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. तसेच द्राक्ष निर्यातीसाठी अनुदान देण्यात यावे आणि बेदाणा उत्पादनास प्राधान्य देण्यात यावे. याबरोबरच नवीन बदल आणि संशोधन यावर अधिक लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
राज्य फलोत्पादन संचालक कैलास मोते म्हणाले, द्राक्ष पिकाच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हरची योजना हाती घेण्यात आली आहे. तसेच ठिबक सिंचन योजनेचा लाभ द्राक्ष पिकाला जातो आहे आणि त्याबरोबर अनुदान देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
द्राक्ष संघ अध्यक्ष पवार म्हणाले, की राज्यात सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष पीक घेण्यात येते. आणि जवळपास ९८ टक्के द्राक्ष राज्यातून निर्यात करण्यात येते. जागतिक बाजार पेठेतील स्पर्धा लक्षात घेता द्राक्ष पिकाचे नवीन वाण विकसित करण्याची गरज असून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
तीन दिवस सुरु राहणाऱ्या अधिवेशनात द्राक्ष पिकाबाबतच्या विविध विषयांची चर्चा आणि व्याख्याने होणार आहेत आणि नंतर द्राक्ष बागायतदार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.








