बेळगाव : श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करताना निर्माल्य जक्कीन होंड तलावात टाकण्यात येऊ नये यासाठी महापालिकेकडून दोन मोठे कायमस्वरुपी निर्माल्य कुंड जक्कीन होंड तलाव परिसरात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांनी निर्माल्य तलावात न टाकता त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कुंडात टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नगरसेवक नितीन जाधव यांनी अलीकडेच आपल्या प्रभागात डिजिटल साईन बोर्ड्स हिंदवाडी आणि आनंदवाडी येथे उभारले आहेत. त्याच बरोबर त्यांच्या प्रभागात येणाऱ्या इंद्रप्रस्थनगर येथील जक्कीन होंडमध्येदेखील गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.
निर्माल्य तलावात टाकण्यात येऊ नये असे आवाहन केले जात असले तरी बहुतांश जणांकडून तलावातच निर्माल्य टाकले जात होते. त्यामुळे तलावाचे पाणी दूषित बनत होते. याबाबत नगरसेवक नितीन जाधव यांनी मनपा आयुक्तांना पत्रव्यवहार करून जक्कीन होंड या ठिकाणी दोन कायमस्वरुपी निर्माल्य कुंड उभारावेत, अशी मागणी केली होती. त्यानुसार नुकतेच त्या ठिकाणी निर्माल्य कुंड उभारण्यात आले असल्याने नागरिक व गणेशभक्तांतून समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी सुनील काकतकर, आसावरी भोकरे, राजेंद्र रेवणकर, सुरेश लिंबिकाई, श्रीकांत देशपांडे, सुदर्शन आजगावकर, विरेश मलिमट यांच्यासह इतर उपस्थित होते.









