पाणीटंचाईवर खबरदारी म्हणून प्रशासनाकडून उपाययोजना : चारा, पाणी समस्या निवारणासाठी 320 कोटीचा निधी मंजूर
बेळगाव : पावसाअभावी जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून 329 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था केली आहे. अति पाणीटंचाई असणाऱ्या गावांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. सरासरी पावसाचे प्रमाण यंदा कमी झाल्याने नदी, नाले आणि जलाशयांच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. त्यामुळे यंदा नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल आणि राकसकोप जलाशयांच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. भूजल पातळीही खाली गेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनू लागली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत. तीव्र पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांमध्ये आठवड्यातून एकदा तर कमी पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांत 15 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यातील बेळगाव 31, खानापूर 43, गोकाक 44, अथणी 33 आणि रायबाग तालुक्यातील गावांमध्ये टँकरच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. डिसेंबर ते जूनपर्यंत पाणी समस्या जाणवणाऱ्या गावांसाठी 1200 टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.
चारा समस्याही गंभीर
जिल्ह्यातील रायबाग, सौंदत्ती, हुक्केरी आदी तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर चारा समस्याही गंभीर बनू लागली आहे. जिल्ह्याला चारा आणि पाणी समस्या निवारणासाठी 320 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. दुष्काळ निवारणासाठी अंदाजे खर्च कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच पाणीटंचाई आणि चाराटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जाणार आहेत. याबाबत तहसीलदार, ग्राम पंचायत पीडीओंना योग्य त्या सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाअभावी जलाशयांच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. त्यामुळे काही गावांना नद्यांच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र आगामी काळात नद्यांच्या पाणीपातळीतही घट होणार आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन 329 गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई अधिक जाणवणार आहे. विशेषत: पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनणार आहे.









