नवी दिल्ली :
दहशतवादी यासीन मलिकच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. यासीन विरोधात दोन प्रकरणांची सुनावणी करत असलेल्या जम्मूच्या विशेष न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची (व्हीसी) व्यवस्था करण्यात यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलला सांगितले आहे. न्यायाधीश अभय ओग अणि उज्ज्वल भुइयां यांच्या खंडपीठाने रुबिया अपहरण आणि वायुदल अधिकारी हत्याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान हा आदेश दिला आहे. याचबरोबर खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलला तिहार तुरुंगात देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा सुनिश्चित करण्याचा निर्देश दिला. खंडपीठाने दोन्ही उच्च न्यायालयांच्या रजिस्ट्रारना 18 फेब्रुवारी रोजी स्थितीदर्शक अहवाल दाखल सादर करण्यास सांगितले आहे. तर सीबीआयच्या याचिकेवर 21 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.









