वाळवा येथील हाळ भागात कृष्णा नदीच्या काठावर मगरीची सुमारे ३५ अंडी, पिल्ली आढळली. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली आहे. वनविभागाने तत्परतेने हे क्षेत्र मगरप्रवण म्हणून जाहीर करत तिथे ये- जा करण्यासाठी मज्जाव केला. हाळभागातून लक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिमटा भागाच्या पूर्व बाजूला नदीकाठी शेतकऱ्यांना ही अंडी, पिल्ली आढळली. नदीतील पाणीपातळीपासून सुमारे दहा फूट अंतरावर एका घळीत ही अंडी, पिल्ली आढळली. मगरीची अंडी, पिल्ली आढळल्यानंतर या भागात नागरिक आणि शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली.
वनविभागाचे अधिकारी आणि वन मजूर दाखल झाले त्यांनी गर्दी हटवून मगरीच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरा लावला. दिवसभर वनमजूर निवास उगळे, विजय मदने, विक्रम टिबे या ठिकाणी तळ ठोकून होते. वनविभागाचे अधिकारी महतेश बगले यांनी भेट दिली. त्यांनी नागरिकांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना केली. मगरीची अंडी, पिल्ली आढळलेला भाग निर्मनुष्य आहे. या ठिकाणी लोकांची वर्दळ फार कमी असते. त्यामुळे नदीच्या पात्रात मगरीचे वास्तव्य लक्षणीय आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मगरीची अंडी, पिल्ली आढळण्याची ही पहिलीच घटना आहे.