वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला क्रिकेट संघाला नव्या प्रमुख प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने पाच इच्छुक प्रशिक्षकांची यादी घोषित केली आहे. यामध्ये अमोल मुजूमदार, तुषार आरोटे आणि जॉन लेविस यांचा समावेश असल्याचे समजते.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी बीसीसीआयने इच्छुकांकडून अर्ज मागविले असून या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मुंबईमध्ये 1 व 2 जुलै रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील. भारताचे माजी क्रिकेटपटू जतीन परांजपे, सुलक्षणा नाईक आणि अशोक मल्होत्रा हे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील. या मुलाखतीनंतर बीसीसीआयतर्फे नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती 2 वर्षांच्या कालावधीसाठी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 2024 साली महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार असून त्यानंतर म्हणजे 2025 साली महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात भरविली जाणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे रमेश पोवार हे यापूर्वी प्रमुख प्रशिक्षक म्हणून होते.