वृत्तसंस्था/ सेंट लुईस, अमेरिका
सेंट लुईसमध्ये संपलेल्या सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झमध्ये अमेरिकेच्या लेव्हॉन अॅरोनियनने जेतेपद मिळविले, तर जागतिक विजेता ग्रँडमास्टर डी. गुकेशने संयुक्तरीत्या सहावे स्थान पटकावले. गुकेशने स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी त्याच्या पहिल्या चार सामन्यांमधून 3.5 गुण कमावत शानदार पुनरागमनाची लक्षणे दाखवविली होती. मात्र नंतर त्याची ऊर्जा विरली.
पहिल्या सामन्यात अॅरोनियनविऊद्ध बरोबरी साधल्यानंतर भारतीय खेळाडूने अमेरिकी शँकलँड, वेस्ली सो आणि उझबेक ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह यांच्यावर मात केली. मात्र त्यानंतर गुकेशने गती गमावली. शेवटच्या पाच सामन्यांपैकी गुकेशने तीन बरोबरीत सोडविले आणि दोन गेम गमावले आणि त्याच्या एकूण मोहिमेचा शेवट 18 गुणांवर केला.
अॅरोनियनने दिवसाची सुऊवात दोन गुणांच्या आघाडीने केली आणि दोन फेऱ्या जिंकत 24.5 वर आपली गुणसंख्या नेली. अमेरिकेचा फॅबियानो काऊआना 21.5 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला, जो फ्रेंच खेळाडू मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्हपेक्षा अर्ध्या गुणाने पुढे राहिला. अब्दुसत्तोरोव्ह 20.5 गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिला, तर वेस्ली सो 19 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आणि व्हिएतनामचा लिम ले क्वांग तसेच गुकेश यांच्यापेक्षा पुढे राहिला.
42 वर्षीय अॅरोनियनने लास वेगास येथे फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅम जिंकल्यानंतर त्याचे हे सलग दुसरे जेतेपद आहे. विजेत्याला एकूण 1,75,000 डॉलर्सच्या इनामांपैकी 40,000 डॉलर्स मिळाले. गुकेशची नजर आता फक्त दोन दिवसांत सुरू होणाऱ्या पुढील स्पर्धेकडे लागून राहिलेली असेल. ग्रँड चेस टूरच्या अंतिम फेरीपूर्वी सिंकेफिल्ड कप ही शेवटची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत गुकेशसोबत त्याचा सहकारी आर. प्रज्ञानंदही सामील होईल. सिंकेफिल्ड कप हा क्लासिकल बुद्धिबळ नियमांनुसार खेळला जाईल जे गुकेशचे बलस्थान आहे.









