वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सोमवारी भारतीय सेनेने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याच्या वृत्ताचा सेनेकडून इन्कार करण्यात आला आहे. पाकिस्तामध्ये घुसून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केलेला नाही. मात्र, पाकिस्तानकडून भारतात दशहतवादी घुसविण्याचा प्रयत्न मात्र हाणून पाडण्यात आला आहे, असे भारतीय सेनेच्या प्रवक्त्यांने स्पष्ट केले.
सोमवारी बालाकोट भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्याआधी काही तास भारताने पाकिस्तानव्याप्त प्रदेशात अडीच किलोमीटर घुसून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केल्याचे वृत्त सोशल मिडियावर प्रसारित झाले होते. त्यामुळे तो चर्चेचा विषय बनला होता. तथापि, असा हल्ला केला नसल्याचे स्पष्टीकरण आता देण्यात आले आहे.
या कथित सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचे सात ते आठ दहशतवादी ठार केल्याचा दावाही करण्यात आला होता. तथापि, हे वृत्त सेनेकडून देण्यात आले नव्हते. असा कोणताही सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलेला नाही. मात्र, सीमेवर भारतीय सेनेचे सैनिक अत्यंत सजगपणे देखरेख करीत असून बालाकोट भागातून दोन दहशतवादी घुसविण्याचा पाक लष्कराने केलेला प्रयत्न अपयशी ठरला. या भागातील सुरक्षा सैनिकांनी वेळीच या पाकिस्तानी दहशतवाद्यांना हेरले आणि त्यांना ठार केले, अशी माहिती सेनेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली.
शस्त्रसाठा जप्त
दहशतवाद्यांना मारल्यानंतर सैनिकांनी या भागात शोधकार्य हाती घेतले. वनविभागांमध्ये खोलवर शोधकार्य केल्यानंतर दहशतवाद्यांनी केलेल्या शस्त्रांचा साठा सैनिकांच्या हाती लागला. यात एक एके 47 रायफल, दोन हातबाँब, दोन मॅगझिन्स, काही स्फोटके आणि पाकिस्तानात तयार झालेली काही औषधे सापडलीं. या साठ्याची तपासणी करण्यात येत असून अद्यापही शोधकार्य सुरु आहे.









