वृत्तसंस्था / कडक (ओडीशा)
येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर झालेल्या 71 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेचे जेतेपद सेनादलाने पटकाविताना अंतिम लढतीत रेल्वेचा पराभव केला.
या अंतिम सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघात चुरस निर्माण झाली होती. निर्धारित वेळेत दोन्ही संघ 30-30 असे बरोबरीत होते. त्यानंतर टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला आणि नवीनकुमारच्या नेतृत्वाखाली सेनादलाने रेल्वेचा 30-30 (6-4) अशा गुणांनी पराभव करत विजेतेपद पटकाविले. नवीनकुमारच्या नेतृत्वाखाली सेनादल संघातील कबड्डीपटूंनी दर्जेदार खेळ केला. या अंतिम सामन्यात उभय संघाकडून भारताच्या अव्वल कबड्डीपटूंचा समावेश होता. रेल्वे संघाकडून हुकमी रायडर पंकज मोहीते तसेच सेनादलाकडून जयदीप दाहीया आणि राहुल सत्पल यांचा दर्जेदार खेळ पहावयास मिळाला.
या स्पर्धेत सेनादलाने पंजाबचा उपांत्य फेरीत 43-35 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. तर रेल्वेने उत्तरप्रदेशचा उपांत्य सामन्यात 42-34 असा फडशा पाडत अंतिम फेरीत स्थान मिळविले. सदर स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत रेल्वेने राजस्थानवर तर सेनादलाने हरियाणावर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. अन्य उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उत्तरप्रदेशने गोवा संघाचा 51-26 तर पंजाबने महाराष्ट्राचा 35-24 असा पराभव केला होता.









