सुरक्षेप्रकरणी भारत अत्यंत सुदैवी नाही :10 वर्षात संरक्षण निर्यात 21 हजार कोटीवर
वृत्तसंस्था/ भोपाळ
सुरक्षेच्या आघाडीवर भारत अत्यंत भाग्यशाली देश नाही. आमचे सैन्य उत्तर आणि पश्चिम सीमेवर सातत्याने आव्हानांना सामोरे जात आहे. आम्ही शांत, बेफिकिर होत बसू शकत नाही. आमच्या देशाचे शत्रू सदैव कुरापती काढण्याच्या तयारीत असतात, असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहेत. राजनाथ सिंह हे मध्यप्रदेशच्या इंदोर जिल्ह्यातील 200 वर्षांपेक्ष जुन्या महू छावणीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
देशात निर्मित संरक्षण उपकरणे निर्यात केली जात आहेत. 10 वर्षांपूर्वी संरक्षण निर्यात 2 हजार कोटी रुपयांची होती. आता हे प्रमाण वाढून 21 हजार कोटीपेक्षा अधिक झाले आहे. आमचे लक्ष्य 2029 पर्यंत 50 हजार कोटी रुपयांचा आकडा गाठण्याचे असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.
सद्यकाळात जगात अनेक पद्धतींनी युद्ध होत आहे. इन्फॉर्मेशन वॉर, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आधारित युद्ध, छुपे युद्ध, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वॉर, अंतराळ युद्ध आणि सायबर हल्ले सर्व देशांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. याकरता सैन्याला विशेष स्वरुपात सज्ज रहावे लागणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटले आहे.
संरक्षणमंत्र्यांनी महू येथील प्रशिक्षण केंद्राचे कौतुक करत प्रशिक्षण अभ्यासक्रमात सातत्याने बदल करत जवानांना प्रशिक्षित करण्यात येत असून आगामी काळात संरक्षण दलं एकत्रितपणे प्रभावी स्वरुपात आव्हानांना हाताळण्यास सक्षम होतील असे उद्गार काढले आहेत. आम्हाला शत्रूंच्या हालचालींवर करडी नजर ठेवावी लागणार आहे. तसेच त्यांच्या विरोधात योग्यवेळी प्रभावी पावले उचलण्याची गरज असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
भारताची चीनसोबत 3 हजार 488 किलोमीटर लांब सीमा लागून आहे. यातील पूर्व सेक्टरमध्ये सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशची सीमा चीनला लागून आहे. याची लांबी 1 हजार 346 किलोमीटर आहे. मध्य सेक्टरमध्ये हिमाचल अन् उत्तराखंड असून याची लांबी 545 किलोमीटर इतकी आहे. तर वेस्टर्न सेक्टरमध्ये लडाखचा समावेश असून त्याची चीनसोबत 1 हजार 597 किलोमीटर लांब सीमा आहे. चीन अरुणाचल प्रदेशच्या 90 हजार चौरस किलोमीटरच्या हिस्स्यावर स्वत:चा दावा करतो. तर लडाखचा सुमारे 38 हजार चौरस किलोमीटरचा हिस्सा चीनच्या ताब्यात आहे.
याचबरोबर 2 मार्च 1963 रोजी चीन-पाकिस्तान यांच्यात झालेल्या एका करारात पाकिस्तानने पीओकेचा 5 हजार 180 चौरस किलोमीटरचा भूभाग चीनला सोपविला होता. एकूण स्थिती पाहता चीनने भारताच्या 43 हजार 180 चौरस किलोमीटरच्या भूभागावर कब्जा केला आहे. तर स्वीत्झर्लंड या देशाचे एकूण क्षेत्रफळ 41 हजार 285 चौरस किलोमीटर इतके आहे. चीनसोबत भारताचा सीमा वाद असून यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
पाकिस्तानसोबत भारताची सीमा 3 हजार 323 किलोमीटर लांबीच आहे. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या 78 हजार चौरस किलोमीटर भूभागावर अवैध कब्जा केला आहे. या भूभागाला पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके म्हणून ओळखले जाते.









