वृत्तसंस्था/ गंगटोक (सिक्कीम)
येथे झालेल्या सहाव्या युवा पुरुषांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत विद्यमान विजेत्या सेनादलाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत सांघिक जेतेपद पटकावले.
या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सेनादल क्रीडा मंडळाच्या मुष्टीयोद्ध्यांनी 11 विविध वजनगटात प्रवेश मिळवत 9 सुवर्णपदकांची कमाई केली. सेनादलाने या स्पर्धेत 85 गुणासह सांघिक जेतेपद पटकावले. तसेच पदकतक्त्यात त्यांनी 9 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कास्य अशी एकूण 13 पदके घेत अग्रस्थान पटकावले. सेनादलाच्या ऋषी आणि आर्यन यांनी अनुक्रमे 48 आणि 51 किलो वजन गटात प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळवले. ऋषीने अंतिम लढतीत बिहारच्या राहुलचा 5-0 तर आर्यनने मनिपूरच्या थोकचोम सिंगचा 5-0 असा पराभव करत सुवर्णपदक घेतले. 54 किलो वजनगटात सेनादलाच्या आशिषने सिक्कीमच्या जयंत डागरचा पराभव करत आपल्या संघाला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने ही अंतिम लढत 4-3 अशा गुणफरकाने जिंकली. सेनादलाच्या निखिलने 57 किलो गटात, एम. हेनथोईने 60 किलो गटात, अंकुशने 67 किलो गटात, प्रित मलिकने 71 किलो गटात, योगेशने 75 किलो गटात, आर्यनने 86 किलो गटात, अरमानने 80 किलो गटात, हर्षने 92 किलो गटात सुवर्णपदके मिळवली. सेनादलाच्या कृष कंबोजने 63.5 किलो गटात, तसेच रिदमने 92 किलोवरील गटात कास्यपदक मिळवले. या स्पर्धेत हरियाणा आणि चंदिगड यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. हरियाणाने 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कास्यपदकासह 54 गुण तर चंदिगडने 2 रौप्य आणि एक कास्यपदकासह 20 गुण नोंदवले. हरियाणाच्या यशवर्धन सिंग, इशान कटारिया आणि लक्ष राठी यांनी सुवर्णपदके मिळवली. या स्पर्धेत सेनादलाच्या आशिष हा सर्वोत्तम मुष्टीयोद्धा म्हणून घोषित करण्यात आला. तसेच सिक्कीमच्या जयंत डागरची सर्वोत्तम युवा मुष्टीयोद्धा म्हणून निवड करण्यात आली.









