काबूल / वृत्तसंस्था
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. सोमवारी पकिस्तानी लष्कर आणि अफगाण तालिबान यांच्यात उडालेल्या चकमकीत 6 जण ठार झाले असून 17 जण जखमी झाले आहेत. सीमा रेषेवरील स्पिन बोल्डक या भागात ही चकमक झडली, अशी माहिती आहे.
हा भाग कंधार विभागात मोडतो. कंधारमधील लोकांचा पाकिस्तानला प्रथमपासूनच विरोध आहे. त्यामुळे येथे स्थानिक अफगाण नेते आणि पाकिस्तानी सैनिक यांच्यात नेहमी चकमकी घडतात. याच संघर्षाचा उद्रेक सोमवारी झाला. ठार झालेल्यांमध्ये काही पाक सैनिकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. मात्र नेमकी संख्या सांगण्यात आली नाही. रविवारी अफगाणिस्तानकडून पाकिस्तानातील बलुचिस्तान भागात लोकवस्तीमध्ये गोळीबार करण्यात आला होता.
समझोत्याचे प्रयत्न विफल
गेल्या आठवडय़ात पाकिस्तानच्या विदेश व्यवहार मंत्री हीना रब्बानी खार यांनी अफगाणिस्तानचा दौरा करून संघर्षावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, तो विफल ठरला. पाकिस्तानच्या काही भागावर अफगाणिस्तानने दावा केला आहे. त्यातून हा संघर्ष वारंवार उफाळत असतो. रब्बानी खार यांच्या दौऱयापूर्वी एका चकमकीत 6 पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. तो तणाव दूर करण्याआधीच सीमेवर नव्या स्थानी संघर्ष पेटला असून गोळीबाराच्या घटना प्रतिदिन घडत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सीमारेषेवरुन वाद
पाकिस्तानचा खैबर पख्तुनख्वा हा प्रांत आपला असल्याचे अफगाणिस्तानचे म्हणणे आहे. मात्र ते पाकिस्तानला मान्य नाही. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमारेषेला डय़ूरँड रेषा असे म्हणतात. पाकिस्तान याच रेषेला सीमारेषा मानतो. मात्र, तालिबानला ही सीमारेषा मान्य नाही. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये नेहमीच संघर्ष असतो. गेल्या सहा महिन्यांमध्ये तो अधिक होत आहे.









