वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लष्कराने अॅडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर ध्रुवच्या कवायती महिनाभरासाठी स्थगित केल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये 4 मे रोजी ध्रुव हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर एका जवानाला प्राण गमवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर लष्कराने आपल्या ताफ्यातील सर्व 191 ध्रुव हेलिकॉप्टरचे ऑपरेशन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 10 मार्च रोजी नौदल आणि तटरक्षक दलाने आपल्या ताफ्यातील ध्रुव हेलिकॉप्टरच्या ताफ्याचे कामकाज स्थगित केले होते. 8 मार्च रोजी गस्तीवर असलेल्या नौदलाच्या ध्रुव हेलिकॉप्टरचे मुंबईजवळील अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते, त्यानंतर या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत लष्कराने ध्रुव हेलिकॉप्टरच्या उ•ाणावर बंदी घातली होती.
सध्या तिन्ही भारतीय सुरक्षा दलांमध्ये 300 हून अधिक ध्रुव हेलिकॉप्टर सामील आहेत. यामध्ये हवाई दलाकडे 70, लष्कराकडे 191 आणि नौदलाकडे 14 हेलिकॉप्टर आहेत. त्याशिवाय नौदलाने 11 तर लष्कराने 73 हेलिकॉप्टरची ऑर्डर दिली आहे. तटरक्षक दलातही ध्रुव हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. सध्याच्या ताफ्यातील काही हेलिकॉप्टरचा वापर वैद्यकीय आणि बचाव कार्यासाठीही केला जातो.









