टी-90, टी-72 रणगाड्यांची सिंधू नदी परिसरात प्रात्यक्षिके
► वृत्तसंस्था/ लडाख
भारतीय लष्कराने नवीन शस्त्रास्त्रे आणि रणगाडे-वाहनांसह नुकताच सिंधू नदीच्या काठावर 14 हजार 500 फूट उंचीवरही युद्धसराव केला. या कसरतींचा व्हिडीओही समोर आला असून त्यामध्ये टी-90 आणि टी-72 रणगाडे नदी पार करताना दिसत आहेत. यापूर्वी भारतीय हवाई दलाने 11 जून रोजी लष्करासोबत युद्ध कवायती केल्या होत्या. या सरावामध्ये लष्कराच्या पॅरा कमांडोनी वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवली होती. लढाऊ विमाने, एलसीएच हेलिकॉप्टर, लष्करी विमाने आणि यूएव्ही म्हणजेच ड्रोन यांचाही या सरावात समावेश होता.
चीनसोबतच्या लडाख सीमेवर गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने न्योमा मिलिटरी स्टेशनवर नवीन लढाऊ रणगाडे, तोफ आणि चिलखती वाहने तैनात केली आहेत. त्यांचे फुटेज आणि फोटो शनिवारी समोर आले. यामध्ये धनुष हॉवित्झरपासून एम-4 जलद कृती दलाच्या वाहनांचा समावेश आहे. यासोबतच लष्कराने डोंगरावर धावणारी सर्व भूप्रदेश वाहनेही तैनात केली आहेत. लडाखमध्ये सुसज्ज असलेली ही लष्कराची नवीन शस्त्रे आहेत. लष्कराने नुकतेच भारतात बनवलेले स्वदेशी धनुष हॉवित्झर दाखल केले आहे. बोफोर्स तोफेची ही प्रगत आवृत्ती आहे. लडाखमधील वेगवेगळ्या ठिकाणी पाळत ठेवण्यासाठी लष्कराने नवीन राजक प्रणाली समाविष्ट केली आहे. हे 15 किमी पेक्षा जास्त अंतरावऊन सैनिक आणि 25 किमी पेक्षा जास्त अंतरावरील वाहने शोधू शकते. नवीन उपकरणे चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सैन्याला मदत करत आहेत.









