वृत्तसंस्था / सियाचिन
हिमालयातील सियाचीन येथे झालेल्या एका भीषण अपघातात एका सेनाधिकाऱ्याला हौतात्म्य प्राप्त झाले असून तीन सैनिक जखमी झाली आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. जखमी सैनिकांना सियाचीनमधून हलविण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
सियाचीन येथे भारतीय सैन्याचे बंकर्स आणि वसतीस्थानी आहेत. यांपैकी एका बंकरला बुधवारी पहाटे आग लागली. ही आग अपघाताने लागल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. आगीच्या कारणांचा आणखी तपास करण्यात येत आहे. बंकरला आग लागली तेव्हा हा अधिकारी आत होता. त्याचा जागीच मृत्यू झाला. तीन सैनिकही जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सियाचीन ही जगातील सर्वाधिक उंचीवर असणारी सामरिक भूमी मानण्यात येते. तिचे स्थान काश्मीरनजीक हिमालयात आहे.
37 वर्षांपूर्वी भारतीय सैन्याने मोठ्या पराक्रमाने हे स्थान आपल्याकडे घेतले. ते घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानी सैन्याने केला होता. हे उंचावरचे स्थान असल्याने ज्याच्या हाती ते आहे, त्याला फार मोठा सामारिक लाभ मिळतो. पाकिस्तानच्या हाती हे स्थान पडले असते तर काश्मीरचा भारताचा प्रत्यक्ष नियंत्रणातील भाग सातत्याने धोक्यात राहिला असता. पण भारताने पाकिस्तानचा डाव हाणून पाडून हे स्थान आपल्या नियंत्रणात आणले आहे. येथील पर्यावरण अत्यंत कठीण असून कडाक्याची थंडी आणि हिमवादळांचा नेहमी धोका असतो. अशा अत्यंत दुर्धर स्थितीत भारतीय सैनिकांनी तेथे भारताचे स्थान सुस्थिर केले आहे. मात्र, हे राष्ट्रीय कर्तव्य करीत असताना येथील कठीण नैसर्गिक स्थितीमुळे आतापर्यंत 800 हून अधिक भारतीय सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना वीरमरण आले आहे.









