यंत्रणेमुळे हवाई सुरक्षा मजबूत होणार : शत्रूच्या ड्रोन-युएव्हीचा शोध-पाठलाग करत नष्ट करण्याची क्षमता प्राप्त
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय सैन्याने हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी सक्षम नावाचे एक इन-हाउस सिस्टीम तयार केले आहे. सक्षम एक काउंटर-अनमॅन्ड एरियल सिस्टीम (सी-यूएएस) असून ती शत्रूचे ड्रोन आणि युएव्हीचा शोध घेत त्यांचा पाठलाग करून प्रत्यक्षवेळेत त्यांना नष्ट करू शकते. हवाई सुरक्षेसाठी भारतीय सैन्याचा हा अत्यंत मोठा पुढाकार मानला जात आहे. ‘सक्षम’मुळे आता 3 किलोमीटरच्या उंचीपर्यंत शत्रूचे ड्रोन किंवा युएव्ही नष्ट करता येतील.
‘सक्षम’ हे सिच्युएशनल अवेयरनेस फॉर कायनेटिक सॉफ्ट अँड हार्ड किल असेट मॅनेजमेंट’चे संक्षिप्त स्वरुप आहे. सक्षम 3डी बॅटलफील्ड व्हिज्युअलायजेशन, रियल-टाइम धोक्याची ओळख पटविणे, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आधारित पूर्वानुमान युक्त विश्लेषणासोबत पूर्ण ताळमेळीसह शस्त्रास्त्रांद्वारे योग्य प्रतिक्रिया देण्यास ‘सक्षम’ असल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले. हे मॉड्यूलर कमांड-अँड-कंट्रोल ग्रिड सिस्टीमचा वापर करते आणि रियल टाइममध्ये शत्रूच्या प्रत्येक अनमॅन्ड एरियल सिस्टीमला उद्ध्वस्त करू शकते. ही सिस्टीम रडार, सेंसर आणि कठोर मारकक्षमतायुक्त अशा अनेक उपकरणे आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे, जे सिंगल युनिटप्रमाणे काम करते.
बीईएलसोबत भागीदारी
भारतीय सैन्याने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल)सोबत मिळून ‘सक्षम’ विकसित केले आहे. ही सिस्टीम आर्मी डाटा नेटवर्कचे (एडीएन) वापर करते. याच्या माध्यमातून भारतीय सैन्याला एक खास ‘मान्यताप्राप्त युएएस छायाचित्रे’ मिळतात. ही छायाचित्रे टॅक्टिकल बॅटलफील्ड स्पेसमध्ये (टीबीएस) दिसतात.
सैन्यासाठी सक्षम आवश्यक
ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने स्वस्त ड्रोन हजारोंच्या संख्येत भारतीय हवाईक्षेत्रात पाठविण्याची आगळीक केली होती. हे भारतीय सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरणार असल्याचे प्रारंभी वाटले होते, परंतु भारतीय सशस्त्र दलांनी ते आव्हान लिलया पेलत पाकिस्तानचा मनसुबा उधळून लावला होता. परंतु तेव्हा अशाप्रकारच्या अत्याधुनिक सुरक्षा प्रणालीची गरज जाणवली. भविष्यात अशा धोक्यांना सामोरे जाण्यासाठी आत्मनिर्भरता आवश्यक होती.
शत्रूचे ड्रोन, युएव्ही नष्ट
आत्मनिर्भर भारताच्या लक्ष्याच्या अंतर्गत भारतीय सैन्य संरक्षण क्षेत्रात अधिक स्वायत्तता इच्छित असून सक्षम त्यातील एक महत्त्वाचा हिस्सा ठरणार आहे. ‘सक्षम’च्या तैनातीमुळे आता शत्रूचे ड्रोन आणि युएव्ही भारतात घुसणे अवघड ठरणार आहे.









