कोणालाही भारतीय सीमेत घुसखोरी करू देणार नाही : उत्तर कमांडचे प्रमुखांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / जम्मू
पाकिस्तानसोबतच्या नियंत्रण रेषेवर (एलओसी) आणि चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) लष्करी जवान नेहमी दक्ष असल्याचे प्रतिपादन भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सोमवारी केले. भारताच्या सीमेत कोणालाही घुसखोरी करू देणार नाही, असेही ते पुढे म्हणाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) जम्मू येथे आयोजित तीन दिवसीय ‘नॉर्थ टेक सेमिनार 2023’ मध्ये त्यांनी यासंबंधी महत्त्वाचे भाष्य केले आहे. याचदरम्यान, चीनने या भागात ‘भारताच्या एक इंचही जमिनीवर कब्जा केलेला नाही’, असे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर (निवृत्त) बीडी मिश्रा यांनीही स्पष्ट केले आहे.
भारतीय लष्कर आणि अन्य सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे दक्ष असून त्यांच्याकडून घुसखोरी रोखण्यासाठी आणि भारतीय भूमीचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. लडाखमधील परिस्थिती “सामान्य आणि खूप चांगली” आहे. नॉर्दर्न कमांडचा लष्करी कमांडर म्हणून मी भारतीय भूभागाचे रक्षण करत असून मी कोणालाही भारतीय हद्दीत येऊ देणार नाही, असे जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले. मात्र, यापूर्वी लडाखच्या 9 दिवसांच्या दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पूर्व लडाखमध्ये चिनी घुसखोरी झाल्याचा आरोप केला होता. भाजपने प्रत्युत्तर देत हा आरोप फेटाळून लावला होता. त्यापाठोपाठ आता लष्करी अधिकाऱ्यांनीही भारतीय भूभाग पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केल्याने राहुल गांधी यांचा दावा फोल ठरला आहे. भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये गेल्या तीन वर्षांपासून दीर्घकाळ सीमेवर तणाव आहे. जून 2020 मध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन शेजारी देशांमधील संबंध बिघडले होते.
एक इंचही जमीन कोणी घेतलेली नाही!
‘राहुल गांधी जे बोलले त्यावर मी भाष्य करणार नाही, पण मी जे ऑनग्राऊंड पाहिले त्यावर भाष्य करू शकतो. भारताची एक इंचही जमीन कोणीही ताब्यात घेतलेली नाही ही वस्तुस्थिती आहे”, असे लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) बीडी मिश्रा म्हणाले. त्याचवेळी लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनीही एलओसी आणि एलएसीवर लष्कर पूर्णपणे तयार असल्याचे स्पष्ट केले. तसेच राष्ट्रीय रायफल्स अंतर्गत भागात सीआय आणि सीटी ऑपरेशन्समध्ये (दहशतवादविरोधी ऑपरेशन्स) सुरक्षा यंत्रणा खूप चांगले काम करत आहेत. या कारवाईत सुमारे 200 दहशतवादी मारले गेल्याचे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानकडून नेहमीच दहशतवादाला प्रोत्साहन
गंभीर आर्थिक संकट आणि इतर समस्यांमध्ये अडकूनही पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. शांतता बिघडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून वारंवार सुरू असतो. पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून नेहमीच घुसखोरीचा प्रयत्न सुरू असतो. मात्र, एलओसी ओलांडण्याचा प्रकार दिसून आल्यास आमचे सतर्क सैनिक सीमेवरच त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या नऊ महिन्यात, 46 दहशतवादी मारले गेले असून त्यामध्ये 37 परदेशी आणि 9 स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.









