वृत्तसंस्था/भटिंडा
भारतीय सैन्यप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांन भटिंडा सैन्यतळाचा दौरा केला . जनरल द्विवेदी यांनी भटिंडा सैन्यतळाच्या वर्तमान सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. तसेच चेतक कोरच्या संचालन तत्परतेचे विस्तृत आकलन त्यांनी केल्याची माहिती सैन्याकडून देण्यात आली आहे. युद्धविषयक तयारी आणि नव्याने समोर येणाऱ्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी एकीकरणाचे त्यांनी कौतुक केले आहे. या दौऱ्यात सैन्यप्रमुखांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त शस्त्रास्त्रs आणि उपकरणांचे प्रदर्शनही पाहिले आहे. यावेळी जनरल द्विवेदी यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या महत्त्वावर जोर दिला.
सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक
भारतीय सैन्य बदलत्या काळात आधुनिक लढाऊ क्षमतांच्या विकासाला सातत्याने बळ देत आहे. तसेच सैन्य राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक ठरलेल्या अत्याधुनिक शस्त्रसामग्रीच्या वापराच्या दृष्टीकोनातून सज्ज देखील आहे. सैन्यप्रमुखांनी निरंतर संचालन सतर्कता राखणे आणि कुठल्याही स्थितीसाठी नेहमी सज्ज राहण्याचे आवाहन सैन्याधिकारी आणि सैनिकांना केले आहे.
सैनिकांसोबत संवाद
सैन्यप्रमुखांनी सैनिकांसोबत सौहार्दपूर्ण संवाद साधला. तसेच कठिण परिस्थितींमध्ये अतूट निष्ठा, शिस्त आणि अद्वितीय युद्धतयारीबद्दल सैनिकांचे कौतुक केले आहे. चेतक कोर कुठल्याही आव्हानाला निडरपणे सामोरे जाण्यास सक्षम असल्याचे म्हणत सैन्यप्रमुखांनी सैनिकांच्या मनोबलाचे कौतुक केले आहे.









