वृत्तसंस्था/ श्रीनगर
लष्करप्रमुख मनोज पांडे सोमवारी दुपारी राजौरी-पूंछ सेक्टरमध्ये पोहोचले. येथे त्यांनी दहशतवाद रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमांचा आढावा घेतला. पूंछमधील अधिकाऱ्यांनी त्यांना सध्याच्या सुरक्षेबाबत माहिती दिली. लष्करप्रमुखांनी कमांडर्सशी संवाद साधत त्यांना मोहीम करताना सतर्क राहण्याची सूचना केली. तसेच सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी समर्थपणे लढा देण्यासाठी प्रोत्साहित केले. गेल्या पंधरा दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी घुसखोरीच्या घटना वाढल्या असून लष्कराकडून योग्य प्रत्युत्तर दिले जात आहे. गुप्तचर विभागाकडून प्राप्त माहितीच्या आधारे विशेष मोहिमाही हाती घेतल्या जात आहेत. या मोहीमेदरम्यानच गुऊवार, 21 डिसेंबर रोजी दहशतवाद्यांनी राजौरीमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला होता. यामध्ये 5 जवान हुतात्मा झाले असून 2 जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. राजौरी-पूंछमधील दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांवर सुरक्षा यंत्रणांकडून करडी नजर ठेवली जात आहे.









