तवांग झटापटीनंतर सुरक्षा सज्जतेचा आढावा
इटानगर / वृत्तसंस्था
गेल्या महिन्यात तवांग येथे भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर 43 दिवसांनी प्रथमच लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे अरुणाचल प्रदेशात पोहोचले. येथे त्यांनी एलएसीला लागून असलेल्या भारतीय चौक्मयांना भेट दिली. यावेळी येथील सुरक्षा सज्जता आणि एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. जवानांशी थेट संवाद साधताना सतर्कतेचे, कर्तव्याचे आणि सुसज्जतेचे कौतुक केले.
गेल्या वषी 9 डिसेंबर रोजी चिनी सैन्याने तवांगमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता. चिनी सैनिकांना त्यांची ऑपरेशनल पोस्ट येथे उभारायची होती. मात्र, सतर्क असलेल्या भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना पळून जाण्यास भाग पाडले होते. भारतीय जवानांच्या या कार्याचे कौतुक करण्यासाठी लष्करप्रमुख थेट अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचले आहेत.
9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांगमधील यांगत्से येथील भारतीय चौकी हटवण्यासाठी 600 चिनी सैनिक घुसखोरीचा प्रयत्न करत होते. भारतीय जवानांनी मागे हटवल्यावर दोन्ही सैन्यात चकमक झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. भारताच्या 6 जखमी जवानांना उपचारासाठी गुवाहाटी येथे आणण्यात आले होते. तर चिनी सैनिकांना आपल्यापेक्षा फटका सहन करावा लागला होता. झटापट झालेले हे ठिकाणी 17 हजार फूट उंचीवर आहे.









