सीडीएस अनिल चौहान यांचे प्रतिपादन : 21 वे शतक भारताचे
वृत्तसंस्था/ बेंगळूर
सैन्याकडील तंत्रज्ञान, त्याच्या काम करण्याच्या पद्धतींमध्ये बदल करण्याची सूचना भारतीय सशस्त्र दलांचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी केली आहे. अलिकडच्या जागतिक घटनाक्रमांमुळे भारताची भूमिका वाढणार आहे. अशा परिस्थितीत सैन्याचा विकास करणे काळाची गरज आहे. 21 वे शतक भारताचे शतक असल्याने सैन्याला देशाच्या गरजांनुसार स्वत:ला बदलावे लागणार असल्याचे प्रतिपादन चौहान यांनी केले आहे.
स्वत:च्या अस्तित्वासाठी परिवर्तन आणि अनुकुलता अत्यंत महत्त्वपूर्ण पैलू असतात. भारतीय सशस्त्रदलांसाठी देखील परिवर्तन आणि विकास तितकाच महत्त्वपूर्ण आहे, जितका कुठल्याही प्रजातीसाठी, कारण आमच्या चहुबाजूला परिवर्तन घडत असल्याचे सीडीएस चौहान यांनी बेंगळूर येथे आयोजित एअर फोर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात म्हटले आहे.
तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांसोबत मिळून मी आमच्या चहुबाजूला होत असलेल्या परिवर्तनांना एका निश्चित दिशेने एक निश्चित वेग देण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही एका अशा युगात प्रवेश करत आहोत, जो अनिश्चित आहे. याचमुळे आम्हाला मोठ्या परिवर्तनाची आवश्यकता भासणार असल्याचे चौहान म्हणाले.
आम्ही स्वत:ला या परिवर्तनांदरम्यान बदलत देखील आहोत. एक सशस्त्र दल देखील स्वत:च्या आसपास होणारे बदल समजते आणि त्यानुसार बदल करत असते. वायुदल हे नेटवर्क केंद्रीत युद्धाला सामोरे जाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर नौदलात आम्ही मोहीम आधारित तैनात पाहिली असल्याचे उद्गार सीडीएस चौहान यांनी काढले आहेत.
वास्तविक समस्या ही संधींची कमतरता नसून अचानक उद्भवणारी संकटांची आहे, या संकटांकरता आम्हाला आवश्यक तयारी करावी लागते. आव्हाने आणि धोके तुलनेत हाताळणे सोपे असते, परंतु अचानक उद्भवणाऱ्या संकटांकरता सज्ज राहणे आवश्यक आहे. आगामी काळात कुठल्या संधी निर्माण होतील याची भविष्यवाणी करणे आमच्यासाठी आव्हानात्मक असल्याचे चौहान यांनी म्हटले आहे.
भू-राजकारणात रशियाचे महत्त्व घटणार
आगामी काळात भू-राजकारणात रशियाचे महत्त्व कमी होणार आहे, तर चीन अधिक आक्रमक राहू शकतो. रशिया एक मोठी आण्विक शक्ती असला तरीही त्याचे महत्त्व कमी होणार आहे. वॅगनर ग्रुपच्या बंडामुळे रशियातील अंतर्गत कमजोरी जगासमोर उघड झाली आहे. तसेच यामुळे भविष्यात रशियात काय घडू शकते याचा अंदाज लावता येऊ शकतो असे चौहान यांनी म्हटले आहे. आगामी काळात रशिया अन् चीनचे हितसंबंध हे परस्परांशी जोडलेले राहणार आहेत. तसेच काही आणखी देश त्यांच्यासोबत जाऊ शकतात. यात उत्तर कोरिया आणि इराणचे नाव सामील असल्याचे चौहान यांनी म्हटले आहे.









