खंडाळ्यातील जमीन अधिग्रहण सूचना रद्द करा- वाटद ग्रामस्थांची एकमुखी मागणी
रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथे प्रस्तावित असलेल्या संरक्षण खात्याच्या शत्रास्त्र उत्पादन प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून शनिवारी त्या परिसरात मोर्चा आणि बैठकीत तीव्र विरोध दर्शवण्यात आला. प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणाची सूचना रद्द करावी, या मागणीसाठी वाटद-खंडाळा येथे भव्य मोर्चा काढण्यात आला.
शनिवारी मोर्चानंतर खंडाळा येथे एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ञ असीम सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, या प्रकल्पाचे संभाव्य पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम यावर सविस्तर प्रकाश टाकला.
स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प झाल्यास त्यांची शेती आणि उपजीविकेचे साधन हेरावले जाईल. तसेच या भागातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. स्थानिकांकडून या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे या प्रकल्प विरोधातील जनआंदोलनाला महत्व प्राप्त झाले आहे.
या मोर्चा व सभा आंदोलनावेळी अॅड. असीम सरोदे, अॅड. रोशन पाटील, संघर्ष समितीचे नेते प्रथमेश गावणकर, उमेश रहाटे, चंद्रकांत धोपट, सुरेश घवाळी, खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सहदेव वीर, उपाध्यक्ष संतोष बारगुडे आदींची उपस्थिती होती








