ब्रिटनमधील गृह सचिवांच्या आदेशाने दिलासा
लंडन / वृत्तसंस्था
शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारी याला भारतात पाठवण्यात येणार आहे. ब्रिटनच्या गृह सचिवांनी भंडारीच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले आहेत. हा भारताचा मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. शस्त्रास्त्रांचे व्यवहार, करचोरी आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये संजय भंडारीचे नाव आघाडीवर आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये ब्रिटनच्या न्यायालयाने त्याला भारतात प्रत्यार्पण करण्याचा निर्णय दिला होता.
लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने फरारी शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिल्यानंतर दोन महिन्यांनंतर ब्रिटनच्या गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन यांनी या प्रकरणाला मान्यता दिली आहे. प्रत्यार्पणाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी भंडारी याच्याकडे आता 14 दिवसांचा अवधी आहे. गृह सचिवांनी भंडारीच्या प्रत्यार्पणाला गेल्या आठवडय़ात मंजुरी दिली आहे. मात्र, भंडारी अजूनही प्रत्यार्पणाविरुद्ध अपील करू शकतो, असे एका अधिकाऱयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
7 नोव्हेंबर 2022 रोजी वेस्टमिन्स्टर जिल्हा न्यायाधीश मायकल स्नो यांनी भंडारीच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले होते. त्यानंतर सदर आदेश गृह सचिव सुएला ब्रेव्हरमन यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या प्रत्यार्पण खटल्यासंबंधीच्या सुनावणीवेळी भंडारीला भारतात खटल्याला सामोरे जावे लागत असताना त्याला आरोग्य सेवेच्या तरतुदींसह नवी दिल्लीतील तिहार तुरुंगातील एका स्वतंत्र कक्षात ठेवले जाईल, असे भारत सरकारने सांगितले होते. 60 वषीय भंडारी हा काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याशी संबंधित मालमत्तेमध्ये कथित मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली चौकशीला सामोरा जात आहे.









