सैन्यप्रमुख मनोज पांडे यांचे वक्तव्य
नवी दिल्ली : सीमेवरील स्थिती स्थिर असल्याने आम्हाला अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्रीय स्वरुपात तयार राहण्याची गरज आहे. आम्ही जगात अभूतपूर्व बदल पाहत आहोत आणि रशिया-युक्रेन संघर्षामुळे आम्ही सैन्य हार्डवेयरच्या आयातीसाठी अन्य देशांवर निर्भर राहू शकत नसल्याचा धडा शिकलो आहोत असे वक्तव्य सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी गुरुवारी केले आहे. 40 हजार अग्निवीरांची पहिली तुकडी संरक्षण दलांमध्ये सामील झाली असून क्षेत्रातून यासंबंधीची प्रतिक्रिया चांगली आणि उत्साहजनक आहे. आम्ही सैन्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ उचलण्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. आमचे लक्ष सैन्याची पुनर्रचना, तंत्रज्ञानाचा समावेश आणि वर्तमान संरचनांमध्ये सुधारणा करण्यावर केंद्रीय असल्याचे सैन्यप्रमुखांनी म्हटले आहे. हिंद-प्रशांत हे आमच्यासाठी आव्हान आणि संधी दोन्हीही ठरणार आहे. आम्हाला विविध सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्रीय राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.









