भरदिवसा घरात घुसून कुटुंबीयांवर पिस्तूल रोखले
बेळगाव : एका रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या घरात भरदुपारी घुसलेल्या एका सशस्त्र टोळीने दहशत माजविली आहे. हातात पिस्तूल घेऊन आलेली पाच जणांची ही टोळी दरोड्यासाठी आली होती की त्यांना त्या व्यावसायिकाला धमकावयाचे होते, याचा उलगडा झाला नाही. रात्री उशिरापर्यंत पोलीस सशस्त्र टोळीतील गुन्हेगारांचा शोध घेत होते. वाढत्या गुन्हेगारीने बेळगावकर पुरते हैराण झाले आहेत. शुक्रवार दि. 25 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास बुडा कार्यालयाजवळील आसद खान सोसायटीत ही घटना घडली आहे. रियल इस्टेट व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबीयांना बाथरूममध्ये कोंडण्यात आले होते. बाथरूमच्या खिडकीच्या काचा खाली फेकून मदतीसाठी त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीला धावले. त्यामुळे कुटुंबीय बचावले आहे.
मैनुद्दीन पठाण (वय 52) यांनी यासंबंधी शुक्रवारी रात्री मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.चार ते पाच जणांचा समावेश असलेल्या सशस्त्र टोळीने शुक्रवारी भरदुपारी आपल्या घरात प्रवेश करून पत्नी, मुलगी व आपल्यावर पिस्तूल रोखल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. मात्र ही सशस्त्र टोळी नेमक्या कोणत्या कारणासाठी मैनुद्दीन यांच्या घरात घुसली, याचा शोध घेण्यात येत आहे. घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, वाहतूक विभागाचे एसीपी जोतिबा निकम, माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे. यासंबंधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सीसीटीव्ही फुटेजवरून सशस्त्र टोळीतील गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शुक्रवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास मैनुद्दीन यांचा मुलगा नमाजला गेला होता. आठ महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यामुळे ते घरीच आहेत. दुपारी ते घरी झोपले होते. त्यांची पत्नी स्वयंपाक घरात होती. मुलगीही घरातच होती. त्यावेळी चार ते पाच जणांची सशस्त्र टोळी घरात शिरली. त्यांनी थेट स्वयंपाक घरात जाऊन त्यांच्या पत्नीच्या डोक्यावर पिस्तूल रोखून ‘मैनू भाई किधर है?’ अशी विचारणा केली. त्यामुळे घाबरलेल्या पत्नीने आरडाओरड केली. त्यावेळी मुलगी आईकडे धावली. आवाज ऐकून मैनूद्दीनही कसेबसे तिथे पोहोचले. मैनुद्दीन यांच्यावर दोघा जणांनी पिस्तूल रोखले. पत्नी, मुलीवरही पिस्तूल रोखण्यात आले होते. पाचपैकी चौघा जणांकडे शस्त्रे होती. तुम्ही दरोड्यासाठी आला आहात का? अशी आपण त्यांना विचारणा केली. त्यावेळी आवाज बंद ठेव नाही तर गोळी घालू, असे गुन्हेगारांनी धमकावले, अशी माहिती मैनद्दीन यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिली. यावेळी जवळच असलेले नगरसेवक मुजम्मील डोनीही तेथे पोहोचले. रात्री उशिरापर्यंत गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत होता.
बाथरूममध्ये कोंडले
आरडाओरडा करताच गुन्हेगारांनी मैनुद्दीन व त्यांच्या कुटुंबीयांना बाथरूममध्ये कोंडून बाहेरून कडी घातली. त्यावेळी बाथरूमच्या खिडकीच्या काचा खाली टाकून कुटुंबीयांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक वरच्या मजल्यावरील त्यांच्या घरी पोहोचले. वाटेतच त्यांना गुन्हेगारही भेटले. मात्र या इमारतीतून बाहेर पडणारे कोण? याची नागरिकांना कल्पना आली नाही.









