वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय कसोटी संघातील अनुभवी आणि मध्यफळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराला क्रीडा युवजन खात्याचे मंत्री अनुराग ठाकुर यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2017 साली चेतेश्वर पुजाराला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला होता पण त्याला भरगच्च क्रिकेट कार्यक्रमामुळे हा पुरस्कार घेता आला नव्हता.
चेतेश्वर पुजारा हा इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत नियमित खेळत असतो. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळातर्फे चेतेश्वर पुजाराची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. चेतेश्वर पुजाराच्यावतीने बीसीसीआयने केद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला. चेतेश्वर पुजाराने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर आणि बीसीसीआयचे आभार मानले आहेत. 2017 च्या क्रिकेट हंगामात पुजाराने 13 कसोटी सामन्यात 1316 धावा जमविल्या होत्या. एक वर्षभराच्या क्रिकेट हंगामात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमवणारा पुजारा हा पहिला भारतीय फलंदाज आहे. चेतेश्वर पुजाराने इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत ससेक्सबरोबरचा करार 2023 पर्यंत केला आहे. पुजाराने इंग्लिश कौंटी चॅम्पियनशिप हंगामात 1000 धावांचा टप्पाही ओलांडला आहे. या स्पर्धेमध्ये त्याने 3 द्विशतके नोंदवले आहे.









