वृत्तसंस्था/ पणजी
बुद्धिबळ विश्वचषकाच्या शनिवारी येथे झालेल्या दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या गेमच्या शेवटी भारतीय ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण आणि व्ही. प्रणव यांनी अनुक्रमे बेल्जियमच्या डॅनियल दर्धा आणि लिथुआनियाच्या टिटास स्ट्रेमाव्हिसियस यांना 1.5-0.5 अशा समान फरकाने पराभूत करून अंतिम 32 खेळाडूंच्या टप्प्यात प्रवेश केला.
आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्म दाखवल्यानंतर हरिकृष्ण या टप्प्यात स्थान मिळवणारा पहिला भारतीय ठरला. कारण दर्धाला पांढऱ्या सोंगाट्यांसह खेळताना काहीही साध्य करता आले नाही आणि भारतीयाविरुद्ध पहिल्या गेममध्ये त्याला स्वीकारावा लागलेला पराभव निर्णायक ठरला. प्रणवसाठीही अशीच कथा राहिला. कारण त्याला पांढऱ्या मोहऱ्यांसह पहिला गेम जिंकल्यानंतर काळ्या मोहऱ्यांसह खेळताना टिकून राहावे लागले. स्ट्रेमाव्हिसियसने त्याची बचावफळी भेदण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु शांत प्रणवने रूक अँड पॉन्स एंडगेममध्ये सामना बरोबरीत आणला.
तथापि, आर्मेनियन गॅब्रिएल सार्गिसियनविऊद्ध मार्ग गमावल्यानंतर दिप्तयन घोष स्पर्धेबाहेर पडला. पहिल्या गेममध्ये पांढऱ्या सोंगाट्यांसह सहज बरोबरी साधल्यानंतर मागील फेरीत रशियाच्या इयान नेपोम्नियचीला हरवणारा दिप्तयन दुसऱ्या गेममध्ये लय मिळवू शकला नाही आणि 0.5-1.5 असा पराभव त्याने पत्करला. उच्च मानांकित भारतीय खेळाडू अर्जुन एरिगेसी आणि आर. प्रज्ञानंद यांनी अनुक्रमे उझबेकिस्तानच्या शमसिद्दीन वोखिदोव्ह आणि आर्मेनियाच्या रॉबर्ट होव्हननिस्यानला हरवून अंतिम 32 खेळाडूंच्या टप्प्यात प्रवेश केला. अर्जुनला पुढील फेरीत नेण्यासाठी बरोबरी पुरेशी होती, तर प्रज्ञानंदने पहिला गेम बरोबरीत सोडविल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये विजय मिळविताना उत्तम खेळ केला.









