आठव्या फेरीअखेर आर. प्रज्ञानंद कार्लसनसह संयुक्त दुसऱया स्थानी
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
येथे सुरू असलेल्या ज्युलियस बायर चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीअखेर भारताचा युवा ग्रँडमास्टर अर्जुन इरिगेसीने 17 गुणांसह अग्रस्थानावर झेप घेतली आहे तर त्याचाच देशवासी आर. प्रज्ञानंदने 15 गुण मिळवित कार्लसनसह दुसरे स्थान मिळविले आहे.
प्रज्ञानंद व विश्वविजेता मॅग्नस कार्लसन यांची आठव्या फेरीतील बहुप्रतीक्षित लढत बरोबरीत राहिली. या मोसमात प्रज्ञानंदने ऑनलाईन स्पर्धेत दोनदा कार्लसनला हरवून खळबळ निर्माण केली होती. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या स्पर्धेच्या दुसऱया दिवशी मंगळवारी प्राथमिक फेरीतील सामन्यानंतर इरिगेसी प्रज्ञानंद व कार्लसन यांच्यापेक्षा दोन गुणांनी पुढे आहे. इरिगेसीने विजयाने दिवसाची सुरुवात करताना अमेरिकेच्या हान्स नीमनवर मात केली आणि नंतर लेव्हॉन ऍरोनियनवरही शानदार विजय मिळविला. सातव्या फेरीत प्रज्ञानंद व इरिगेसी यांच्यात झालेली लढतही 67 चालीनंतर बरोबरीत राहिली. दिवसातील शेवटच्या आठव्या फेरीत इरिगेसीने क्रोएशियाच्या इव्हान सॅरिकला बरोबरीत रोखले.

17 वर्षीय प्रज्ञानंदनने पाचव्या फेरीत रॅडोस्लॉ वोस्टाझेकविरुद्ध अनिर्णीत सामन्याने दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर पुढच्या फेरीत त्याने जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरवर विजय मिळविला. त्यानंतर आठव्या फेरीत प्रज्ञानंदने कार्लसनला 67 चालीत बरोबरीत रोखले. या स्पर्धेत खेळणारा तिसरा भारतीय भास्करन अधिबन 3 गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. नवव्या फेरीत त्याची लढत प्रज्ञानंदविरुद्ध होणार आहे.
दरम्यान, कार्लसनने हान्स नीमनविरुद्धचा सामना दोन चालीनंतरच सोडून दिला. सेंट लुईस येथील सिन्क्वेफील्ड चषक बुद्धिबळ स्पर्धेत अमेरिकेच्या 19 वर्षीय नीमनकडून पराभूत झाला होता. या लढतीत आपली फसवणूक झाल्याचा आरोप करून कार्लसनने स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर तो येथे सहाव्या फेरीत नीमनविरुद्ध खेळताना केवळ दोनच चाली झाल्यानंतर त्याने डाव सोडून दिला. सातव्या फेरीत मात्र त्याने ऍरोनियनवर विजय मिळवित प्रज्ञानंदसमवेत संयुक्त दुसरे स्थान मिळविले.
युक्रेनचा अनुभवी खेळाडू व्हॅसील इव्हान्चुकने प्रभावी प्रदर्शन पुढे चालू ठेवत 13 गुणांसह चौथे स्थान मिळविले आहे. 53 वर्षीय इव्हान्चुकने पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली होती. पण दुसऱया दिवशी फारसा लाभदायक ठरला नसला तरी केमरवर मात करण्यात तो यशस्वी ठरला. त्याआधीच्या दोन फेऱयांत त्याला अमेरिकेचा युवा खेळाडू ख्रिस्तोफर यू व पोलंडचा वोस्टाझेक यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारावे लागले.
प्राथमिक फेऱया संपल्यानंतर बाद फेरीला सुरुवात होणार असून फायनल दोन दिवसांची असेल. आठ दिवस होणारी ही स्पर्धा 25 सप्टेंबरला समाप्त होईल. तीन पिढय़ांतील सोळा खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला आहे.









