वृत्तसंस्था/ चेन्नई
भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन इरिगेसीने येथे सुरू असलेल्या चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये सर्बियाच्या अलेक्झांडर प्रेडकेचा पराभव करून पहिला विजय नोंदवला.
या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत निकाली ठरलेला हा एकमेव सामना होता. अन्य तीन सामने मात्र अनिर्णीत राहिले. किशोरवयीन ग्रँडमास्टर व स्थानिक स्टार डी. गुकेशने इराणच्या परहाम मॅघसूदलू याला 30 चालीत बरोबरीत रोखले. त्याचा हा सलग तिसरा अनिर्णीत डाव होता. त्याचे 1.5 गुण झाले असून तो पाचव्या स्थानावर आहे. इरिगेसीने प्रेडकेवर पांढऱ्या मोहरांनी खेळताना 71 चालीत विजय मिळविला. त्याचेही 1.5 गुण झाले आहेत. पहिल्या लढतीत त्याला अनुभवी पी.हरिकृष्णकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हरिकृष्ण व युक्रेनचा पॅव्हेल इलॅनोव्ह यांचा डाव 34 चालीत अनिर्णीत राहिला. हरिकृष्ण व हंगेरीचा सॅनन सुगिरोव्ह प्रत्येकी 2 गुण मिळवित संयुक्त आघाडीवर आहेत. गुकेश व इरिगेसी पुढील वर्षी होणाऱ्या कँडिडेट्स स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. येथे चांगले प्रदर्शन केल्यास त्याचा त्यांना फायदा होणार आहे. अन्य एका लढतीत सुगिरोव्हने अमेरिकेच्या लेव्हॉन अॅरोनियनला बरोबरीत रोखले.
तिसऱ्या फेरीनंतरचे गुण : सॅनन सुगिरोव्ह, पी.हरिकृष्ण 2 गुण, अॅरोनियन, इलॅनोव्ह, गुकेश, इरिगेसी प्रत्येकी 1.5 गुण, प्रेडके, मॅघसूदलू प्रत्येकी 1 गुण.









