वृत्तसंस्था/ आयसल ऑफ मॅन, यूके
फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या अर्जुन इरिगेसीने स्पेनच्या अँटन गुइजारोवर शानदार विजय नोंदवला तर एसएल नारायणनने ग्रँडमास्टर अब्दुसत्तोरोव्ह नॉडिरबेकला बरोबरीत रोखण्यात यश मिळविले आणि विदित गुजराथीनेही पहिला विजय मिळविताना अभिजीत गुप्ताला हरविले.
अर्जुनने गुइजारोचा एका चुकीचा लाभ घेत 40 चालीनंतर विजय मिळविला. या स्पर्धेआधी झालेल्या कतार मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत नारायणनने चमकदार प्रदर्शन करीत तिसरे स्थान मिळविले होते. येथे तो काळ्या मोहरांनी खेळताना 33 चालीत नॉडिरबेकला बरोबरीत रोखले. रौनक साधवानीने शानदार प्रदर्शन पुढे चालू ठेवताना अमेरिकेच्या हिकारु नाकामुराविरुद्धचा डावही अनिर्णीत राखला. केवळ 25 चालीनंतर दोघांनी बरोबरीस संमती दिली. आधीच्या फेरीत रौनकने हॉलंडच्या अनिश गिरीला बरोबरीत रोखले होते. पहिल्या फेरीत हॉलंडच्या एर्विन लामीकडून पराभूत झालेल्या विदित गुजराथीने दुसऱ्या फेरीत संघर्षपूर्ण विजय मिळविताना आपल्याच देशाच्या अभिजीत गुप्ताचा पराभव केला.
महिला विभागात माजी वर्ल्ड चॅम्पियन टॅन झाँगयीने भारताच्या दिव्या देशमुखचा पराभव केला तर बी.सविता श्रीला अँटोनेटा स्टेफानोव्हाकडून पराभव स्वीकारावा लागला. ग्रँडमास्टर डी हरिकाला हंगेरीच्या होआंग थांग ट्रँगने बरोबरीत रोखले. हरिकाचा हा सलग दुसरा अनिर्णीत सामना होता. अन्य सामन्यात तानिया सचदेवला जर्मनीच्या दिनारा वॅग्नरने बरोबरीत रोखले तर वंतिका अगरवालला इंडोनेशियाच्या ऑलीया मेदिना वार्दाने हरविले.









