वृत्तसंस्था/ आयसल ऑफ मॅन, यूके
फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत भारताच्या अर्जुन इरिगेसीने कझाकच्या रिनत झुमाबाएव्हवर शानदार विजय मिळवित अन्य दोन खेळाडूंसह संयुक्त आघाडीचे स्थान मिळविले.
त्याचे पाच सामन्यात 4 गुण झाले असून अमेरिकेचा द्वितीय मानांकित हिकारु नाकामुरा, रशियाचा आंद्रेय एसिपेन्को यांच्यासह तो आघाडीवर आहे. नाकामुराने या फेरीत सर्बियाच्या अॅलेक्सी सारानाचा पराभव केला तर एसिपेन्कोने अग्रमानांकित अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला बरोबरीत रोखले. अर्जुनने झुमाबाएव्हवर 69 चालीत विजय मिळविला. विदित गुजराथीसह एकूण 16 खेळाडू 3.5 गुणांसह संयुक्त चौथ्या स्थानावर आहेत. गुजराथीची विजयी घोडदौड रोखताना रशियाच्या एव्हगेनी नाजेरने त्याला बरोबरीत रोखले. डी. गुकेशचे पदक जिंकण्याची आशा मात्र संपुष्टात आली असून आपल्याच देशाच्या एसएल नारायणनकडून त्याला पराभवाचा धक्का बसला. दोन आठवड्याच्या कालावधीत नारायणनचा हा गुकेशवरील दुसरा विजय आहे.
अन्य सामन्यात पी. हरिकृष्णने युक्रेनच्या रुसलान पोनोमॅरोव्हला बरोबरीत रोखले तर अरविंद चिदंबरम व निहार सरीन यांचा सामनाही अनिर्णीत राहिला. रौनक साधवानीला मात्र इराणच्या परहम मघसूदलूकडून हार पत्करावी लागली. आर. वैशालीने युक्रेनच्या अॅना म्युझीचुकला बरोबरीत रोखले. वैशालीने आधीच्या फेरीत अॅनाची बहीण मारियाला हरविले होते. वैशाली, अॅना व अग्रमानांकित रशियाची अलेक्झांड्रा गोऱ्याचकिना यांच्यासह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे. कझाकच्या बिबिसारा असॉबाएव्हाने 4.5 गुण घेत अग्रस्थान मिळविले आहे. या फेरीत तिने चीनच्या टॅन झाँगयीचा पराभव केला.
अन्य भारतीय खेळाडूंत डी. हरिकाने मुसंडी मारताना दिव्या देशमुखवर विजय मिळवित एकूण 2.5 गुण मिळविले तर बी. सविता श्री व वंतिका अगरवाल यांनी इस्टोनियाची माइ नारवा व स्वित्झर्लंडची अलेक्झांड्रा कोस्टेनियुक यांच्याविरुद्धची डाव अनिर्णीत ठेवले. याशिवाय तानिया सचदेवने पोलंडच्या ओलिविया किओलबासावर विजय मिळविला.









