अष्टविनायक कला क्रिडा मंडळाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन
न्हावेली /वार्ताहर
मळगाव रस्तावाडी येथील अष्टविनायक कला क्रिडा मंडळाच्यावतीने दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या दुर्ग बांधणी स्पर्धेत मळगाव देऊळवाडी येथील अर्जुन विजय गावकर याने प्रथम क्रमांक पटकाविला.मळगाव रस्तावाडी येथील अष्ट विनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने स्वच्छता मोहीम, एसएससी व स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सत्कार, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, दुर्ग बांधणी स्पर्धा तसेच इतर स्पर्धा आदी विविध उपक्रम राबविले जातात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व त्यांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने ही दुर्ग बांधणी स्पर्धा मंडळाच्या वतीने राबविण्यात आली होती. स्पर्धेत एकूण १३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्जुन विजय गावकर (श्रीमान रायगड), द्वितीय क्रमांक अथर्व अमित राऊळ (दुर्ग प्रतापगड), तृतीय क्रमांक खुशाल सुशांत शिरोडकर (दुर्ग प्रतापगड) यांनी मिळविला असून उत्तेजनार्थ क्रमांक हर्षिता सहदेव राऊळ (जंजिरे सिंधुदुर्ग) व देवेश राजन राऊळ (दुर्ग मल्हारगड/सोनोरी) यांनी पटकाविला. स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम आज शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास २००१/- रु. द्वितीय क्रमांकास १५०१/- रु. तृतीय क्रमांकास ७०१/- रु व उत्तेजनार्थ क्रमांकास ३५१/- रु. व सन्मानचिन्ह व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धकांना पुरस्कृत करण्यात आलेली पारितोषिके कै.श्री. दिलीप सोनुर्लेकर स्मरणार्थ प्रसन्न मांजरेकर, मंडळाचे उपाध्यक्ष सिध्देश तेंडोलकर, राहुल नार्वेकर, राजा राऊळ व शंभा सावंत यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आली होती यावेळी प्रमुख पाहुणे गुरुनाथ नार्वेकर,मंडळाचे उपाध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर,सदस्य ज्ञानेश्वर राणे, निलेश नाटेकर, संदेश सोनुर्लेकर, सचिन सोनुर्लेकर, उदय फेंद्रे, अरुण राऊळ, गोविंद कानसे, प्रसाद नार्वेकर, पालक व सहभागी मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गुरुनाथ नार्वेकर यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर राणे,प्रास्ताविक निलेश नाटेकर व आभारप्रदर्शन उपाध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर यांनी केले.









