वृत्तसंस्था/ लास वेगास, अमेरिका
फ्रीस्टाइल बुद्धिबळ ग्रँड स्लॅममधील ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीची स्वप्नवत वाटचाल येथे आर्मेनियन-अमेरिकन खेळाडू लेव्हॉन अॅरोनियनकडून 0-2 असा पराभव झाल्याने उपांत्य फेरीत संपुष्टात आली. फ्रीस्टाइल ग्रँड स्लॅमच्या अंतिम चार खेळाडूंच्या टप्प्यात पोहोचणारा पहिला भारतीय ठरताना जोरदार कामगिरी केलेला एरिगेसी या फेरीत लय गमावून बसला आणि अॅरोनियनला मात्र त्याचा फॉर्म गवसला.
प्राथमिक टप्प्यात आघाडीच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यासाठीच्या प्ले-ऑफमध्ये मॅग्नस कार्लसन आणि क्वार्टरफायनलमध्ये हिकारू नाकामुरा यांना हरवल्यानंतर अर्जुन पहिल्या गेममध्ये आपल्या संधींचे रूपांतर करण्यात अपयशी ठरला. अॅरोनियन कठीण स्थितीत असूनही दृढ राहिला आणि अर्जुन त्याच्या अनुकूलतेचा फायदा घेऊ शकला नसल्याने त्याला इनाम मिळाले.
परतीच्या गेममध्ये अॅरोनियनला पुढे जाण्यासाठी फक्त बरोबरीची आवश्यकता असताना त्याने सुऊवातीपासून थोडीशी अनुकूलता मिळवण्यासाठी सूक्ष्मपणे खेळ केला. सामना संतुलित स्थितीत येताच तो अनिर्णित राहण्याची शक्यता दिसू लागली होती. परंतु सामन्यात टिकून राहण्यासाठी विजयाची आवश्यकता असलेल्या अर्जुनने अनावश्यक जोखीम पत्करली, जे त्याला महागात पडले.
अमेरिकेचा हान्स मोके निमन हा अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा खेळाडू ठरला. त्याने त्याचा सहकारी फॅबियानो काऊआनाला हरवले. निमन पहिल्या गेमसाठी थोडा उशिरा पोहोचला, पण तो लढत बरोबरीत सोडविण्यात यशस्वी झाला. आणखी दोन सामने बरोबरीत सुटल्यानंतर तऊण अमेरिकन खेळाडूने काही सुरेख मिडल गेम खेळून काऊआनाला हरवले.
जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या आर. प्रज्ञानंदने तिसऱ्या ते आठव्या स्थानासाठीच्या प्लेऑफमध्ये जर्मनीच्या विन्सेंट कीमरला हरवले. प्रज्ञानंदने काळ्या सोंगाट्यांनिशी खेळताना पहिला गेम बरोबरीत सोडवला आणि परतीच्या गेममध्ये कीमरला हरवून सामना 1.5-0.5 असा नावावर केला. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसननेही उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हविऊद्ध त्याच फरकाने विजय मिळवला. इतर सामन्यांमध्ये अमेरिकेच्या वेस्ली सोने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हचा 3-1 असा पराभव केला, तर दोन अमेरिकन खेळाडूंदरम्यानच्या सामन्यात हिकारू नाकामुराने लेनियर दुमिंग्वेझ पेरेझचा 2-0 असा पराभव केला.









