जागतिक जलद व ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा : हम्पी, हरिकाही संयुक्तपणे पहिल्या स्थानी
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक जलद आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेतील आणखी एका प्रभावी कौशल्य प्रदर्शनाच्या दिवसानंतर भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी संयुक्तपणे आघाडीवर पोहोचला आहे. सध्या चार खेळाडू आघाडीवर असून त्यापैकी तो एक आहे.
पोलंडचा डुडा जान-क्रिझस्टोफ, रशियन व्होलोदार मुर्झिन आणि अलेक्झांडर ग्रिसचुक हे दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर आणि स्पर्धेच्या 9 व्या फेरीनंतर अर्जुनसह सात गुणांनी आघाडीवर आहेत. 13 सामन्यांनंतर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू कोण हे ठरणार आहे. कार्लसनला अपात्र ठरविल्याने अर्जुनची संधी वाढली आहे कारण नॉर्वेचा कार्लसन वेगवान आवृत्तीत मुसंडी मारण्यासाठी ओळखला जातो. आता 10 व्या फेरीत भारतीयाचा मुकाबला ग्रिसचूकशी होईल.
महिला विभागातही भारतीयांना संधी वाढली असून तिथे कोनेरू हम्पीने पहिल्या फेरीतील पराभव बाजूला ठेवत सलग चार सामने जिंकून सहकारी डी. हरिका आणि चीनची वेनजुन जू यांच्यासह 6.5 गुणांनिशी आघाडी घेतली आहे. तथापि, शनिवारचा दिवस अर्जुनचा राहिला. त्याने अमेरिकेच्या रॉबसन रेला पराभूत केले आणि नंतर आर्मेनियाच्या सरगस्यानवर विजय मिळवला. मुर्झिन आणि डुडा यांच्याविऊद्धच्या दोन बरोबरीमुळे त्याला अवघ्या चार फेऱ्या बाकी असताना अव्वल स्थान मिळाले.
‘ड्रेस कोड’च्या पालनास नकार, कार्लसन अपात्र
दरम्यान, जीन्स परिधान करून सामने खेळण्यास आल्याने आणि ‘फिडे’च्या ड्रेस कोडचे पालन करण्यास नकार दिल्याने पाच वेळचा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला आधी दंड ठोठावण्यात आला आणि नंतर अपात्र करण्यात आले. या कारवाईचे सावट शनिवारच्या खेळावर राहिले. गतविजेत्या कार्लसनला जीन्स परिधान केल्याबद्दल 200 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. स्पर्धेच्या नियमांनुसार जीन्स परिधान करणे स्पष्टपणे प्रतिबंधित आहे. जेव्हा त्याने मुख्य आर्बिटर अॅलेक्स होलोझॅक यांनी ताबडतोब पोशाख बदलण्याची केलेली विनंती नाकारली तेव्हा त्याला अपात्र ठरवण्यात आले आणि रॅपिडच्या 9 व्या फेरीत त्याला समाविष्ट केले गेले नाही. ही स्पर्धा वॉल स्ट्रीट येथे होत आहे.









