वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंजर
विद्यमान विश्वविजेता डी. गुकेशची घसरण सुरूच असून भारतीय खेळाडूला आर्मागेडन टायब्रेकमध्ये पराभव पत्करावा लागला आणि तो पाचव्या स्थानावर घसरला आहे, तर अर्जुन एरिगेसीने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकन हिकारू नाकामुराला हरवून नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील आपले चौथे स्थान कायम राखले.
गतविजेता मॅग्नस कार्लसनने चमक दाखवत आणखी एक अमेरिकन ग्रँडमास्टर फाबियानो काऊआनाविऊद्ध काळ्या रंगाच्या सोंगाट्या घेऊन खेळताना आर्मागेडन टायब्रेकमध्ये विजय मिळवला. त्यामुळे त्याचे गुण 9.5 वर गेले आहेत. ज्या दिवशी या स्पर्धेत सर्वच स्तरांवर आकर्षक कामगिरी झाली त्या दिवशी खुल्या श्रेणीतील तिन्ही सामने अनिर्णित राहिले. त्यामुळे आर्मागेडन टायब्रेकचा वापर करून कोंडी फोडण्यात आली.
गुकेश आणि चिनी ग्रँडमास्टर वेई यी यांच्यातील सामन्यात चिनी खेळाडूचे पारडे मधल्या टप्प्यात भारी झाले होते, तर काळ्या सोगाट्यांसह खेळणाऱ्या गुकेशला शेवटच्या टप्प्यात अनुकूलता प्राप्त झाली होती. पण हा क्लासिकल गेम बऱ्याच अनिश्चिततेनंतर अखेर अनिर्णितावस्थेत संपला. आर्मागेडनमध्ये कार्लसन आणि नाकामुरा यांना मागील सामन्यांत हरविलेल्या वेईने आपला तिसरा टायब्रेक विजय नोंदवला आणि गुकेश त्याचे नशीब बदलण्यासाठी उत्तरे शोधत राहिला. चिनी खेळाडूने नंतर कबूल केले की, त्याने क्लासिकल गेममध्ये गुकेशला मागे टाकण्याची एक उत्तम संधी गमावली. ज्यामुळे त्याला तीन पूर्ण गुणांऐवजी दीड गुणावर समाधान मानावे लागले.
नाकामुराने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार, काळ्या सोंगाट्या घेऊन खेळत असतानाही सुऊवातीपासूनच वेईवर हल्ला करण्याची गुकेशची प्रवृत्ती हे स्पष्ट करते की, भारतीय खेळाडू क्लासिकल गेममध्ये अडचणीत का आला. शेवटच्या टप्प्यात विश्वविजेता गुकेश हा सामना जिंकण्याच्या जवळ पोहोचला होता, परंतु अखेरीस दोन्ही खेळाडूंसाठी बरोबरी हाच निकाल योग्य ठरला. दुसरीकडे, स्लाव्ह डिफेन्समध्ये दुर्मिळ कल्पना वापरून एरिगेसीने नाकामुराला आश्चर्यचकीत केले. अमेरिकन खेळाडूला जिंकण्याची मोठी संधी असूनही तो गडबडला आणि हा सामना बरोबरीत संपला. त्यानंतर आर्मागेडन टायब्रेकचा शेवट देखील नाकामुरासाठी वेदनादायक ठरला. हा सामनाही तो ज्ंिांकण्याच्या वाटेवर होता. पण घड्याळावर तीन मिनिटे असतानाही त्याने बेफिकीरपणे खेळलेली चाल अंगलट आली.
काऊआनाविऊद्धच्या आर्मागेडन विजयासह कार्लसन 9.5 गुण घेऊन गुणतालिकेत आघाडीवर आहे. काऊआना 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर नाकामुराचे 6.5 गुण झालेलें आहेत. महिला विभागात दोन वेळा जागतिक रॅपिड चॅम्पियन ठरलेल्या कोनेरू हम्पीने चीनच्या लेई टिंगजीविऊद्ध टायब्रेक विजय मिळवून 8.5 गुणांसह आघाडी घेतली, तर आर. वैशालीने इराणी-स्पॅनिश खेळाडू सारा खादेमविऊद्ध निर्णायक विजय मिळवून तीन गुणांची कमाई केली आणि 6.5 गुणांसह ती चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. तीन पूर्ण गुण मिळवल्यानंतर शेवटच्या स्थानावरून पुढे सरकलेली वैशाली म्हणाली, ‘हा विजय चांगला वाटतो. पहिले काही सामने माझ्या मनासारखे झाले नाहीत. मला आशा आहे की, येथून पुढे माझ्यासाठी स्पर्धा चांगली जाईल’.









