वृत्तसंस्था / श्यामकेंट (कझाकस्तान)
16 व्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी भारताचे नेमबाज अर्जुन बबुता आणि इलाव्हेनील व्हॅलेरव्हेन यांनी 10 मी. मिश्र सांघिक एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले.
अर्जुन आणि इलाव्हेनील या जोडीने 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारातील अंतिम फेरीत चीनच्या लु आणि पेंग यांचा 17-11 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तामिळनाडूची इलाव्हेनील आणि पंजाबच्या 26 वर्षीय बबुताने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येकी 2 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. बबुताने रुद्रांक्ष पाटील आणि किरण जाधव यांच्या समवेत पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळविले आहे. तसेच शांभवी श्रवण आणि नरेन, प्रणव यांनी 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक कनिष्ठ गटात सुवर्णपदक मिळविताना चीनच्या जोडीचा 16-12 असा पराभव केला.









