वृत्तसंस्था/ लिमा (पेरू)
येथे सुरु असलेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताचा ऑलिम्पियन नेमबाज अर्जुन बाबुटाने पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजी प्रकारात रौप्यपदक मिळविले. बाबुटाचे सुवर्णपदक केवळ 0.1 गुणाने हुकले. या स्पर्धेत पदक तक्त्यात भारताने तिसरे स्थान मिळविले आहे.
पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत सुवर्णपदकासाठीच्या लढतीत भारताचा अर्जुन बाबुटा आणि चीनचा विद्यमान ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता शेंग लिहाओ यांच्यात कडवी चुरस पहावयास मिळाली. पण चीनच्या लिहाओने 252.4 गुणासह सुवर्णपदक पटकाविले. बाबुटाने 252.3 गुणासह रौप्यपदक तर हंगेरीच्या पेनीने 229.8 गुणासह कांस्यपदक मिळविले. गेल्या वर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीच्या या प्रकारात बाबुटाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. नेमबाजीच्या या प्रकारामध्ये स्वीडनचा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता व्हिक्टर लिंडग्रेन, नॉर्वेचा जॉन हेग तसेच भारताचा माजी विश्वविजेता रुद्रांक्ष पाटील यांचा समावेश होता. रुद्रांक्ष पाटीलने गेल्या आठवड्यात ब्यूनोस आयरिस येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.
महिलांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताच्या आर्या बोर्सेला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पात्र फेरीमध्ये तिने 633.9 गुण मिळविले होते. या क्रीडा प्रकारात चीनच्या वेंग झिफेईने सुवर्णपदक तर चीनच्या हेन झियायुने रौप्यपदक तसेच चीनच्या फेन झिनेईने कांस्यपदक घेतले. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी चीनच्या नेमबाजांकडून 3 नवे विश्वविक्रम नोंदविले गेले आहेत. या स्पर्धेच्या पदक तक्त्यात चीनने आघाडीचे स्थान मिळविताना 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 10 पदकांची कमाई केली. अमेरिका दुसऱ्या स्थानावर असून भारताने 2 सुवर्ण, 2 रौप्य व 1 कांस्य अशी एकूण 5 पदकांसह तिसरे स्थान घेतले आहे.









