स्थगिती खटल्याचा निकाल 9 मार्च रोजी लागण्याची शक्यता
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याला न्यायालयाने स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी जोरदार खटाटोप केला. मात्र शेतकऱ्यांचे वकील रवीकुमार गोकाककर यांनी अत्यंत कायद्याच्या चौकटीत युक्तिवाद करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांना चांगलेच कोंडीत पकडले. न्यायालयानेही शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता या स्थगिती खटल्याचा निकाल 9 मार्च रोजी लागणार आहे. हलगा-मच्छे बायपास रस्त्याला आठवे दिवाणी आणि जेएमएफसी न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्याविरोधात उच्च न्यायालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने धाव घेतली होती. त्याठिकाणी हा खटला बेळगाव येथीलच न्यायालयात चालविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुख्य दिवाणी सिनिअर न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
महामार्गाच्या वकिलांचा पुन्हा वेळ मागण्याचा प्रयत्न
राष्ट्रीय महामार्गाच्या वकिलांनी न्यायालयासमोर आपला युक्तिवाद करताना शेतकऱ्यांबद्दल काही त्रुटी दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर शेतकऱ्यांचे वकील रवीकुमार गोकाककर यांनी जोरदार युक्तिवाद केला. नोटिफिकेशनच चुकीचे आहे. जोपर्यंत झिरो पॉईंट निश्चित होत नाही तोपर्यंत नोटिसा पाठविणे हेच मुळात चुकीचे आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या वकिलांनी पुन्हा वेळ मागण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने यापूर्वीच तुम्हाला वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे आता आम्ही अधिक वेळ देऊ शकत नाही. काय असेल तर ते कागदोपत्री येथेच दाखल करा, असे सांगितले. त्यावर मयत झालेल्या शेतकऱ्यांची नावे दाखल करण्याचा प्रयत्न केला. हा खटलाच मुळात चुकीचा आहे. न्यायालयाने दिलेली स्थगिती चुकीची आहे, असे सांगण्याचा प्रयत्न महामार्गाच्या वकिलांनी केला. मात्र न्यायालयाने त्यांच्या बऱ्याच गोष्टी फेटाळल्या आहेत. अॅड. गोकाककर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्थगिती उठविण्याबाबत दाखल केलेला खटला चुकीचा असून तो फेटाळून लावावा, अशी मागणी केली आहे.









