वृत्तसंस्था/ लंडन
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात पंचांसोबत झालेल्या वादामुळे दंड ठोठावण्यात आला आहे. हरमनप्रीतने रागाने तिची बॅट स्टंपवर आपटली होती. मैदानावरील अयोग्य वर्तनामुळे हरमनप्रीत कौरला आता तिच्या मॅच फीच्या 75 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, आयसीसीकडून तीन डिमेरीट पॉइंट देखील मिळाले आहेत.
भारत व बांगलादेश महिला संघांमधील वनडे मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना 22 जुलै रोजी मिरपूर येथे खेळला गेला. दोन्ही संघांमधला सामना बरोबरीत सुटला, त्यानंतर दोघांना संयुक्तपणे मालिकेचे विजेते घोषित करण्यात आले. सामन्यादरम्यान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने रागाच्या भरात बॅट स्टंपवर आपटली. यानंतर तिने पंच तनवीर अहमद यांच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर सादरीकरण सोहळ्यातही तिचा राग शांत झाला नाही. तिथेही त्याने पंच आणि त्याच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले.
आयसीसीच्या नियमानुसार कोणत्याही खेळाडूला 24 महिन्यांच्या आतमध्ये चार डिमेरीट पॉइंट्स मिळाले, तर त्याला एक कसोटी किंवा दोन मर्यादित षटकांच्या सामन्यातून बाहेर बसावे लागते. शनिवारी घातलेल्या वादानंतर हरमनप्रीतला तीन डिमेरीट पॉइंट्स मिळाले आहेत. अशामध्ये येत्या 24 महिन्यांमध्ये अजून एक डिमेरीट पॉइंट जर तिला मिळाला, तर आयसीसीकडून तिच्यावर एक कसोटी किंवा दोन मर्यादित षटकांच्या सामन्यात बंदी घातली जाईल. दरम्यान, पंचासोबत घातलेला वाद तिला चांगलाच महागात पडला आहे.









