शेल्डे सरपंच कविता गावस देसाई यांचा दावा : हे विरोधकांचे कारस्थान
वार्ताहर /केपे
कावरेपिर्ला पंचायतीचे ‘लेटरहेड’वर वापरल्याच्या मुद्यावरून जो वाद सुरू झाला आहे त्यात काहीच तथ्य नसून कोणी तरी चुकीची माहिती पसरविली आहे. आपली नाचक्की करण्याच्या उद्देशाने विरोधकांनी रचलेले हे कारस्थान आहे, असा दावा शेल्डेच्या सरपंच कविता गावस देसाई यांनी शेल्डे पंचायतीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी उपसरपंच प्रमोद गावस देसाई, पंच जोहान फर्नांडिस, मिलाग्रीनो फर्नांडिस, मीनाक्षी चिमूलकर, मारिया मास्कारेन्हस व इतर हजर होते. कावरेपिर्ला पंचायत व शेल्डे पंचायतीचे ‘लेटरहेड’ एकाच स्वरुपाचे असून जेव्हा माझ्याकडे ‘लेटरहेड’ सहीकरिता आले तेव्हा अनेक फायली आल्या होत्या. मला तातडीने पोलीस स्थानकात व त्यानंतर वकिलाकडे कामासाठी जायचे होते. त्यामुळे जेव्हा त्या फायली आल्या त्यावेळी मी ‘लेटरहेड’वरील मजकूर वाचून त्यावर सही केली. त्यावर सरपंच व पंचायतीचा शिक्का आहे, असे सरपंच गावस देसाई यांनी सांगितले.
तसेच एका प्रकरणी पंचायतीला ‘बीडीओ’कडून ताबडतोब कारवाई करण्यास सांगण्यात आले हेते. त्यानुसार पत्र तयार करण्यात आले होते. मात्र चूक नजरेस येताच ती दुरुस्त करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. पण विरोधकांकडून उगाच गोंधळ घातला जात आहे. आदित्य देसाई यांच्याकडून जे भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत ते त्यांनी सिद्ध करून दाखवावेत. विरोधकांनी विरोध करायचा असतोच. मात्र काही जण आपण भाजप समर्थक असल्याचे दाखवत प्रत्यक्षात ‘आरजी’ला सहकार्य करत आहेत, असा दावा सरपंच कविता गावस देसाई यांनी केला. तसेच काही दिवसांपूर्वी तत्कालीन सरपंचांना अविश्वास ठराव आणून पायउतार केल्याने असे केले जात आहे, असा दावा त्यांनी केला. ज्या कारकुनाकडून चूक झाली आहे त्यासंबंधी गटविकास अधिकाऱ्यांना माहिती दिली असून त्यांनी मेमो जारी करावा असे सांगितले आहे, असेही सरपंचांनी स्पष्ट केले.









