गावात तणावाचे वातावरण : काही जणांना मारहाण, ग्रामस्थांनी केले आंदोलन, पोलिसांचे शांततेचे आवाहन
बेळगाव : परंपरेनुसार राजहंसगडावर देवाची पालखी नेण्यात येते. मात्र देवस्थान पंच कमिटी असताना, किल्ला अभिवृद्धी कमिटी ग्रामस्थांना विश्वासात न घेता स्थापन करण्यात आली. परिणामी देवस्थान पंच कमिटीने गडावर पालखी नेण्याऐवजी गावातील सिद्धेश्वर मंदिरातच ठेवण्याचा निर्णय घेतला. या कारणावरून राजहंसगड गावामध्ये जोरदार वादावादी झाली त्यामुळे रविवारी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही जणांना मारहाण करण्यात आली. यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन केले होते या घटनेमुळे बराच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.
आजपर्यंत देवस्थान पंच कमिटीच्या माध्यमातून राजहंसगडावर पालखी नेण्यात येत होती. मात्र किल्ला अभिवृद्धी कमिटी नेमण्यात आली. ही कमिटी नेमताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही. असा आरोप करण्यात आला. त्यानंतर देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थांनी गावातील सिद्धेश्वर मंदिरामध्येच पालखी सोहळा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काहीजणांनी रविवारी सकाळी 9 वाजता पालखी राजहंसगडावर नेण्याचे प्रयत्न केले. यामुळे जोरदार वादावादी झाली. त्यानंतर बाहेरून तीस ते पस्तीस जणांना बोलावून घेऊ गावातील देवस्थान पंच कमिटीच्या एका सदस्याला मारहाण केली. त्यामुळे वातावरण आणखी चिघळले. गेल्या काही महिन्यांपासून अभिवृद्धी कमिटी गावातील धार्मिक कामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ठिया आंदोलन केले. या घटनेची माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस फौजफाटा तैनात केला. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मारहाण केलेल्यांना अटक करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी पोलिसांच्याबरोबरही वादावादी झाली. त्यानंतर बेळगाव ग्रामीणचे एसीपी यांनी समजूत काढली. तरी रात्री उशिरापर्यंत गावामध्ये तणावाचे वातावरण होते.
सत्तर वर्षांची परंपरा खंडित
ग्रामस्थांना विश्वासात न घेता किल्ला अभिवृद्धी कमिटी स्थापन केल्यामुळे 70 वर्षांची राजहंसगडावर पालखी नेण्याची परंपरा खंडित झाली. श्रावण महिना तसेच दसऱ्यानिमित्त राजहंसगडावरील सिद्धेश्वर मंदिरामध्ये पालखी नेण्यात येते. मात्र राजकीय संघर्षामुळे परंपरा खंडित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.









