नावगे क्रॉसवरील घटनेत एकमेकांविरुद्ध एफआयआर
बेळगाव : चिकन दुकानात सुरू असलेल्या वादावादीचे मोबाईलवरून व्हिडिओ चित्रिकरण केल्यावरून झालेल्या वादावादीनंतर दोघा जणांवर कात्रीने हल्ला करण्यात आला आहे. त्यानंतर एका हेअरकटिंग सलूनची मोडतोड करण्यात आली आहे. रविवार दि. 26 जानेवारी रोजी सायंकाळी नावगे क्रॉसजवळ ही घटना घडली आहे. राजू शंकर गुरव (वय 35), यल्लाप्पा मोनाप्पा गवळी (वय 36) दोघेही राहणार नावगे अशी जखमींची नावे आहेत. यासंबंधी परस्परांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी हल्लाप्रकरणी एकाला अटक केली आहे. या घटनेने नावगे क्रॉस परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
राजू गुरव याने दिलेल्या फिर्यादीवरून हेअरकटिंगचा दुकानचालक विशाल बसवराज नावगेकर, रा. नावगे याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर विशाल नावगेकरने दिलेल्या फिर्यादीवरून राजू गुरव, यल्लाप्पा गवळी, प्रशांत शिवाजी सुतार, रवी वैजू पाटील सर्व राहणार नावगे या चौघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक आदित्य राजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध माहितीनुसार नावगे क्रॉसवर विशाल नावगेकरचे हेअरकटिंग सलून आहे.
या दुकानाजवळच राजू गुरव याचे चिकन दुकान आहे. रविवारी सायंकाळी चिकन खरेदीसाठी आलेल्या एका बिहारी व्यक्तीने दुकानदाराबरोबर भांडण काढले. याचवेळी हेअरकटिंग सलूनमध्ये बसलेल्या एका तरुणाने आपल्या मोबाईलवरून या भांडणाचा व्हिडिओ केला. व्हिडिओ केल्यामुळे दोन दुकानदारांमध्ये वादावादी सुरू झाली. त्यावेळी विशाल नावगेकरने राजू गुरववर कात्रीने हल्ला केला. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या यल्लाप्पा गवळीवरही हल्ला करण्यात आला. याचे पर्यवसान हेअरकटिंग सलूनची तोडफोड करण्यात झाली. याआधी दुकान सोडवल्यावरून निर्माण झालेल्या वैमनस्यातून ही घटना घडली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.









