नेपाळमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा
वृत्तसंस्था/काठमांडू
हिंसक आंदोलनाच्या माध्यमातून नेपाळमध्ये सरकार उलथविण्यात आल्यानंतर आता नव्या नेत्याच्या निवडीवरुन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या गटांमध्येच प्रचंड वाद निर्माण झाला आहे. सुशिला कार्की आणि बालेन शहा या दोन नेत्यांच्या समथकांमध्ये गुरुवारी नेपाळची राजधानी काठमांडू येथे प्रचंड राडा झाला. मारामारीमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आंदोलनामुळे ओली सरकारचे पतन झाल्यानंतर आता नेपाळमध्ये नवा नेता आणि नवे सरकार नियुक्त करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे.
सध्याच्या काळात नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीश सुशिला कर्की आणि नेपाळ विद्युत मंडळाचे माजी प्रमुख अधिकारी कुलमान घिशिंग यांची नावे आघाडीवर आहेत. तथापि, काठमांडू शहराचे महापौर बालेन शहा यांच्या समर्थकांची संख्याही मोठी असल्याचे मानले जाते. या विविध नेत्यांच्या समर्थकांमध्ये आता मोठे रणकंदन माजले असून त्यामुळे नेता निवड होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. काठमांडूमधील भद्रकाली येथे नेपाळी सेनेच्या मुख्यलयासमोर गुरुवारी कार्की समर्थक आणि शहा समर्थक विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मारामारी झाल्याचे पहावयास मिळाले. पोलीसांना स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. या देशात ही नवी समस्या निर्माण झाली असून ती लवकर न सुटल्यास परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रत्येक बैठकीनंतर नवे नाव
पदच्युत नेते के. पी. शर्मा ओली यांनी पदत्याग केल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी आणि नव्या नेत्याच्या निवडीसाठी विद्यार्थी नेत्यांच्या काही बैठका झाल्या आहेत. तथापि, प्रत्येक बैठकीनंतर नवे नाव समोर येत आहे. त्यामुळे परिस्थिती अत्यंत स्फोटक असून ती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न नेपाळच्या सेनादलांकडून केला जात आहे. सरकारचे पतन झाल्यानंतर या देशात अराजकासारखी स्थिती निर्माण झाली होती. प्रचंड हिंसाचार, हत्या आणि लूटमार यामुळे आंदोलन नेते काही काळ शांत होते. तथापि, आता त्यांच्यातच मतभेद विकोपाला गेल्याने परिस्थिती आणखी वाईट वळण घेत आहे. या परिस्थितीत तेथील सेना आणि पोलीस यांच्यावर शांतता राखण्यासाठी मोठे उत्तरदायित्व येऊन पडले आहे. आंदोलनाचा भर आता ओसरला असला, तरी नव्या नेत्याची आणि अंतरिम सरकारची निवड लवकर झाली नाही, तर या अधांतरी परिस्थितीचा लाभ समाजकंटकांकडून उठविला जाण्याची शक्यता आहे.
चार प्रमुख स्पर्धक
सध्या नेपाळमध्ये मुख्य नेतेपदासाठी चार प्रमुख नेत्यांमध्ये स्पर्धा असल्याचे दिसून येते. अंतरिम प्रमुख नेतेपदासाठी सुशिला कार्की, बालेन शहा, कुलमान घिशिंग आणि हरका संपांग ही नावे चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या परिस्थितीत देशात कायदा आणि सुव्यवस्था स्थिती भक्कम ठेवणे हे आमच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान आहे, असे नेपाळच्या सेनादलांनी स्पष्ट केले आहे.
रविवारपासून सर्वोच्च न्यालालय उघडणार
नेपाळच्या हिंसाचारात सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीलाही आग लावण्यात आली होती. मात्र, आता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून येत्या रविवारपासून सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचा पुन्हा प्रारंभ होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. सरन्यायाधीश प्रकाशमान सिंग राऊत यांनी या संदर्भात वकील संघटना, सर्वसामान्य जनतेच गट आणि मान्यवर यांच्याशी चर्चा केली आहे. आंदोलनाच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या फायलींचे संरक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. या हिंसाचारात नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयातील 25 हजार फायली जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. रविवारी कामकाजास प्रारंभ झाल्यानंतर खरी परिस्थिती उघड होईल, अशी भावना आहे.
कार्की भारत समर्थक
नेपाळ सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीश सुशिला कार्की यांच्यावर विरोधी गटातील विद्यार्थ्यांनी त्या भारत समर्थक असल्याचा आरोप केला आहे. त्यांची नियुक्ती अंतरिम नेतेपदी करण्यास या गटाचा विरोध आहे. मात्र, कार्की यांच्या समर्थकांची संख्याही मोठी असल्याची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे समर्थन करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांनी त्यांच्या पाठीशी बळकटपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला असून सध्या त्यांचे पारडे जड असल्याची भावना आहे. मात्र, ऐनवेळी सर्वसहमतीच्या नेत्याचे नाव पुढे येण्याचीही शक्यता आहे.
संभ्रमाची परिस्थिती…
- सरकारच्या पतनानंतर आता नेपाळमध्ये राजकीय अनागोंदीची परिस्थिती
- विद्यार्थी नेत्यांमध्ये नव्या नेत्याच्या नावासंबंधी महागोंधळ, गटबाजी शक्य
- सेनेच्या मुख्यालयासमोर झालेल्या हाणामारीत अनेक विद्याथ्यांना जखमा









