कोल्हापूर :
शाहू छत्रपती केएसए वरिष्ठ ‘ए’ फुटबॉल लीगमध्ये बुधवारी दुपारी प्रॅक्टीस फुटबॉल क्लब व उत्तरेश्वर प्रासादीक तालीम मंडळातील सामान्यावेळी पंचांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. सामना संपल्यानंतर प्रॅक्टीस क्लबचे संघ व्यवस्थापक विकी जाधव यांनी पंच सुमित जाधव यांना शिवीगाळ करत हुज्जत घातली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सामना सुरू असताना पंचांनी दिलेल्या निर्णयाचा जाब विचारत खेळाडूंसह संघ व्यवस्थापकांनी हुज्जत घातली. मात्र, पंचांनी आपला निर्णय कायम ठेवला. सामना संपताच संघ व्यवस्थापकांनी जाब विचारण्यास सुरूवात केली. यावेळी पंच व संघव्यवस्थापक यांच्या वादावादी झाली. संघ व्यवस्थापक जाधव हे पंचांच्या अंगावर धावून जावू लागले. शिवीगाळ करण्यास सुरूवात करताच त्यांना रेडकार्ड दाखविण्यात आले. व्यवस्थापकाडून पंचांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने स्पर्धेला गालबोट लागले. घडल्या प्रकाराबाबत केएसएकडून आज कायरवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. केएसएकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष आहे.








