वृत्तसंस्था/ थिरुवनंतपूरम
आंतरराष्ट्रीय स्टार फुटबॉलपटू लायोनेल मेस्सीसह अर्जेन्टिनाचा राष्ट्रीय संघ केरळमधील कोची येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध फुटबॉल सामना खेळण्याची शक्यता आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये हा दक्षिण अमेरिकन संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यावेळी हा सामना खेळविला जाणार असल्याचे क्रीडा विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.
या मैत्रिपूर्ण सामन्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. पण ही लढत 12 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत केव्हाही कोचीमध्ये खेळविली जाणार आहे. या अवधीत मेस्सी व अर्जेन्टिनाचा संघ केरळमध्ये असणार आहे. या लढतीत ऑस्ट्रेलिया संघच त्यांच्याविरुद्ध खेळण्याची जास्त शक्यता आहे, असेही या सूत्राने सांगितले. अर्जेन्टिनाने 2022 माध्ये विश्वचषक जिंकला आहे.
अर्जेन्टिना संघाच्या केरळ भेटीवर यावर्षीच्या ऑगस्टमध्ये वाद निर्माण झाला होता. मेस्सीसह अर्जेन्टिना संघ केरळमध्ये येणार नसल्याचे काही वृत्तात म्हटले होते. पण त्याच महिन्यात नंतर राज्याचे क्रीडामंत्री व्ही अब्दुरहिमान यांनी अर्जेन्टिना संघ नोव्हेंबरमध्ये राज्यात दाखल होणार असल्याच स्पष्ट केले होते.









