वृत्तसंस्था/ ब्युनोस आयर्स
2026 च्या विश्वचषकात स्थान मिळवण्याबरोबर गतविजेत्या अर्जेंटिनाने पारंपरिक प्रतिस्पर्धी ब्राझीलला मोठ्या फरकाने हरवून दाखविलेले आहे. बोलिव्हिया उऊग्वेला हरवू शकला नाही. त्यामुळे पुढील वर्षी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्याकडून संयुक्तपणे आयोजित केल्या जाणाऱ्या 48 संघांच्या विश्वचषकातील दक्षिण अमेरिका खंडातील सहा थेट स्थानांपैकी एक निश्चित करण्याच्या दृष्टीने अर्जेंटिनाकडे पुरेशी संधी होती.
एल अल्टो येथे बोलिव्हियाने उऊग्वेशी गोलशून्य बरोबरी साधल्यानंतर लिओनेल मेस्सीच्या अनुपस्थितीत मंगळवारी मोन्युमेंटल डी नुनेज स्टेडियमवर 85,000 चाहत्यांसमोर अर्जेंटिनाने ब्राझीलचा 4-1 असा पराभव केला. दक्षिण अमेरिकी विश्वचषक पात्रता फेरीच्या इतिहासातील ब्राझीलच्या या सर्वांत मोठ्या पराभवामुळे प्रशिक्षक डोरिवल ज्युनियर यांच्यावरचा दबाव वाढला आहे. त्यांनी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पदभार स्वीकारला होता.
दक्षिण अमेरिकी पात्रता फेरीत ब्राझील 21 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे आणि अर्जेंटिनापेक्षा 10 गुणांनी, पण दुसऱ्या स्थानावर असलेल्या इक्वेडोरपेक्षा फक्त दोन गुणांनी मागे आहे. इक्वेडोरलाही चिलीने गोलशून्य बरोबरीत रोखले. तिसऱ्या स्थानावर असलेल्या उऊग्वे आणि पाचव्या स्थानावर असलेल्या पॅराग्वेचेही 21 गुण आहेत आणि सहाव्या स्थानावर असलेला कोलंबिया त्यांच्यापेक्षा एका गुणाने मागे आहे. नवव्या स्थानावर असलेल्या पेरूवर 1-0 असा विजय मिळवल्यानंतर सातव्या स्थानावर असलेल्या व्हेनेझुएलाचे 15 गुण झाले आहेत.
ब्राझीलला तीन नियमित खेळाडू गोलकीपर अॅलिसन, डिफेंडर गॅब्रिएल मॅगालहेस आणि मिडफिल्डर ब्रुनो गुइमारेस यांची कमतरता सुरुवातीपासून भासली. विश्वचषक पात्रता स्पर्धेत अर्जेंटिनाने ब्राझीलविऊद्धचे दोन्ही सामने जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. अर्जेंटिनाने खेळ सुरू झाल्यानंतर 12 मिनिटांतच आपले पहिले दोन गोल केले.









