वृत्तसंस्था/ सेंट इटेनी (फ्रान्स)
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरूषांच्या फुटबॉल या क्रीडा प्रकारात अर्जेंटिना आणि इजिप्त यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अर्जेंटिनाने युक्रेनचा तर इजिप्तने बलाढ्या स्पेनचा पराभव केला.
मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अर्जेंटिनाने युक्रनेचे आव्हान 2-0 असे एकतर्फी संपुष्टात आणत शेवटच्या 8 संघात स्थान मिळविले. अर्जेंटिनातर्फे थियागो अल्मेडाने तसेच इचेव्हेरी यांनी प्रत्येकी एक गोल केला. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत गोल फलक कोरा होता. उत्तरार्धांतील खेळाच्या दुसऱ्या मिनीटाला अल्मेडाने युक्रेनच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत अर्जेंटिनाचे खाते उघडले. त्यानंतर सामना संपण्यात 10 मिनीटे बाकी असताना इचेव्हेरीने अर्जेंटिनाचा दुसरा गोल करुन युक्रेनचे आव्हान संपुष्टात आणले. अर्जेंटिनाच्या बचावफळीची कामगिरी अत्यंत भक्कम झाल्याने युक्रेनला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. अन्य एका सामन्यात मोरोक्कोने इराकचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.
क गटातील मंगळवारी झालेल्या सामन्यात इजिप्तने बलाढ्या स्पेनवर 2-1 अशी गोल फरकाने निसटता विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. स्पेनने या पराभवानंतरही स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. कारण या गटात स्पेनचा संघ पहिल्या स्थानावर आहे. डॉम्निक प्रजासत्ताक व उझ्बेक यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. स्पेन विरुद्धच्या सामन्यात इजिप्ततर्फे इब्राहिम अदेलने दोन गोल केले. पुरूष फुटबॉल या क्रीडा प्रकारात विविध देशांचा चार गटात समावेश असून प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. स्पेन विरुद्धच्या सामन्यात अदेलने पूर्वार्धात तसेच उत्तरार्धात असे दोन गोल नोंदविले. स्पेनतर्फे एकमेव गोल सामु ओमरोडीयॉनने गोल केला.









